स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच महाराष्ट्रातील प्रभावशील वक्त्यांनी समाजकारणावरही प्रचंड प्रभाव टाकला आहे. स्वातंत्र्यानंतर आणीबाणीच्या काळातही महाराष्ट्रातील विचारवंतांनी आणि वक्त्यांनीच आणीबाणीविरोधात भूमिका घेतली होती. देशातील विविध महत्त्वाच्या टप्प्यांवर आणि राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रांत महाराष्ट्रातील वक्त्यांनी बजावलेल्या मोलाच्या भूमिकेला अभिवादन करण्यासाठी लोकसत्ताने आता राज्यभरातील तरुण वक्त्यांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेली नाथे समूह प्रस्तुत वक्तृत्त्व स्पर्धा आज, शुक्रवारपासून सुरू होत आहे. पृथ्वी एडिफाइसच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेडच्या मदतीने होणाऱ्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवारी पुणे आणि अहमदनगर या केंद्रांवर रंगणार आहे.

लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. 

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर लोकसत्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयांत दडलेल्या तरुण वक्त्यांना व्यासपीठ देण्यासाठी ही वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून अडीचशेहून अधिक महाविद्यालयांतील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी उद्या, १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. शुक्रवारी पुणे आणि अहमदनगर या दोन केंद्रावर प्राथमिक फेरी रंगेल. पुणे येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत ही स्पर्धा होईल. तर अहमदनगर येथे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेण्ट स्टडीज येथे सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत होईल.
प्राथमिक फेरीसाठी दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर स्पर्धकांना किमान आठ ते कमाल दहा मिनिटे भाषण करायचे आहे. या प्राथमिक फेरीतील विजेत्यांना विभागीय अंतिम फेरीत आपले वक्तृत्त्वगुण सिद्ध करावे लागतील. विभागीय अंतिम फेरीदरम्यान एका महनीय वक्त्याद्वारे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
*पुणे येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत ही स्पर्धा होईल. तर अहमदनगर येथे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेण्ट स्टडीज (आयएमएससीडीआर) येथे सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत होईल.