प्राथमिक विभागातील ५०० वक्ते.. विभागीय अंतिम फेरीत आपल्या भाषणांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे १२०हून अधिक वक्ते.. आणि या १२० वक्त्यांमधून सवरेत्कृष्ट ठरलेले नऊ वक्ते.. ‘लोकसत्ता वक्तृत्त्व स्पर्धा’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेने संपूर्ण राज्य ढवळून निघाल्यानंतर आता या स्पर्धेची महाअंतिम फेरी येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात होणाऱ्या या महाअंतिम फेरीसाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून सर्व वक्त्यांना मार्गदर्शन करतील. तसेच या स्पर्धक वक्त्यांसाठी महाअंतिम फेरीच्या आदल्या दिवशी लोकसत्तातर्फे एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील नामवंत वक्ते स्पर्धकांना वक्तृत्त्वाच्या विविध अंगांबाबत मार्गदर्शन करतील.
नाथे समुह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्वमिा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता वक्तृत्त्व स्पर्धा या राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पध्रेत राज्यभरातील अडीचशेहून अधिक महाविद्यालयांतील ५०० हून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक फेरी आणि विभागीय अंतिम फेरी यांतून निवड झालेल्या नऊ वक्त्यांची महाअंतिम फेरी आता मुंबईत पार पडणार आहे. महाअंतिम फेरीसाठी रूईया महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यभार सांभाळणारे आणि वक्तृत्त्वापासून नाटकांपर्यंत सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांत मोलाची कामगिरी बजावणारे विजय तापस आणि ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे परीक्षक म्हणून लाभले आहेत. या स्पध्रेला जनकल्याण सहकारी बँक आणि तन्वी हर्बल यांचीही मदत लाभली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे  प्रमुख पाहुणे
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्या अमोघ वाणीने महाराष्ट्रात आणि भारतातच नाही, तर परदेशातही पोहोचवणारे, शिवचरित्रावर हजाराहून अधिक कार्यक्रम करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या महाअंतिम फेरीचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्पध्रेदरम्यान बाबासाहेबही स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
उत्तम वक्ते घडवण्यासाठी कार्यशाळा!
या नऊ स्पर्धकांना वक्तृत्त्वाच्या विविध अंगांचे मार्गदर्शन करण्यासाठी लोकसत्ताने खास कार्यशाळा आयोजित केली आहे. वक्तृत्त्व आणि वादविवाद स्पर्धादरम्यान विषयाचे सादरीकरण कसे करावे, या विषयावर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी स्पर्धकांशी संवाद साधतील. सादरीकरणातील कौशल्य, आवाजातील चढउतार विषयांबाबत अभिनेते व कवि किशोर कदम मार्गदर्शन करणार असून, स्पर्धासाठीची पूर्वतयारी कशी करावी, विषयाचा अभ्यास कसा करावा, या विषयावर सूत्रसंचालक आणि निवेदिका धनश्री लेले मदत करणार आहेत.