पर्यावरण रक्षणाचा जागर करणारी ‘लोकसत्ता’ची अभिनव स्पर्धा

पर्यावरणाचे रक्षण ही कुणा एका संस्थेची किंवा सरकारची जबाबदारी आहे असे मानून आपण फक्त त्याविषयीच्या मोठमोठय़ा गप्पा माराव्यात, हा समाजमानसात असलेला गैरसमज दूर करायला हवा. वैयक्तिक स्तरावर पर्यावरण रक्षणासाठी मला नेमके काय करता येईल, याचे भान बाळगणे आणि त्यादृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणाबद्दल एकूणच समाजमनात केवळ वैचारिक नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून जागृती व्हावी, या उद्देशाने ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा २०१७’ अंतर्गत ज्या सोसायटय़ा ओला कचरा, सुका कचरा आणि ई-कचरा अशा पद्धतीने वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून पर्यावरणाचे रक्षण करतात त्यांना या पर्यावरण रक्षणाच्या अभिनव स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अनेक गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी कचरा कमी करणे, कचऱ्याचे विलगीकरण करणे, त्यावर पुन:प्रक्रिया करणे आणि त्याचा पुनर्वापर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असतात. अशा प्रकारे पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटय़ांनाच या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या सोसायटय़ांना एकूण दहा लाखांपेक्षा जास्त रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

यांना सहभागी होता येईल

या स्पर्धेत कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, पालघर, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि पनवेल याशिवाय, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या शहरातील या गृहनिर्माण संस्था-सोसायटी यांना सहभाग घेता येईल.

प्रवेशिका पाठवा

या अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोसायटय़ांना एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे स्पर्धेच्या प्रवेशिका ३० मे २०१७ पर्यंत ‘लोकसत्ता ब्रँड विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१’ या पत्त्यावर पाठवा. mpcbnewyear@gmail.com  वर मेल करा. स्पर्धेची अधिक माहिती आणि फॉर्म http://mpcb.gov.in  या संकेतस्थळावरून घेता येईल.