समाजात घडणाऱ्या किंवा समाजावर परिणाम करणाऱ्या घटनांवर भाष्य करणे, प्रसंगी समयोचित प्रबोधन करून समाजमन घडवणे, चांगल्या कार्याची प्रशंसा करून त्याला प्रोत्साहन देणे हे वृत्तपत्रांचे इतिकर्तव्य. मात्र, पेड न्यूज पर्वाने बरबटलेल्या व उच्छृंखलता म्हणजेच पत्रकारिता असा समज पसरवून त्याला अधिक बळकटी कशी येईल याला खतपाणी घालणाऱ्या वृत्तपत्रांमुळे या इतिकर्तव्याचा विसर पडत चालल्याचे अलीकडचे चित्र आहे. परंतु लोकमान्य लोकशक्ती लोकसत्ताने कायमच आपल्या इतिकर्तव्याचे भान बाळगले आहे. त्यामुळेच सामाजिक दायित्वाचा घेतला वसा ‘लोकसत्ता’ने कधीही टाकला नाही, टाकणारही नाही. सर्वकाय्रेषु सर्वदा हे त्याचे प्रातिनिधिक उजळ उजवे उदाहरण.
समाजोपयोगी कार्य करणाऱ्या निवडक दहा संस्थांची ओळख वाचकांना करून देत त्यांच्या कार्यासाठी आíथक मदतीचे हात उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात वाचकांना विविध क्षेत्रात कार्यरत दहा संस्थांची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष.  
गेल्या तीन वर्षांत या उपक्रमाद्वारे कुष्ठरोगी व वंचितांच्या जीवनात आनंदवन फुलवणारी बाबा आमटेंची ‘महारोगी सेवा समिती’, घरापासून दुरावलेल्या मुलांच्या आयुष्यातील अंधार पुसण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे ‘समतोल फाऊंडेशन’, स्मृतिभ्रंशामुळे घरापासून भरकटलेल्यांचा सांभाळ करीत त्यांची आप्तजनांशी भेट घडवणारे नगरचे ‘माऊली सेवा केंद्र’, आईच्या ममतेने गतिमंदांची सेवा करणारे नाशिकचे ‘प्रबोधिनी ट्रस्ट’, ठाण्याची ‘अमेय पालक संघटना’, अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या नागपूरच्या राम इंगोलेंचे ‘विमलाश्रम’, पुण्याचे ‘भारतीय इतिहास संशोधक मंडळ’ तसेच धुळ्याचे ‘वि. का. राजवाडे संशोधन केंद्र’, चिपळूणचे ‘लोकमान्य वाचनालय’, विज्ञानाची कास धरलेले सोलापूरचे ‘विज्ञानग्राम’; अशा तीस संस्थांच्या अनन्यसाधारण कार्याची ओळख ‘सर्व कार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने करून दिली. वाचकांनीही या संस्थांच्या कार्याची महत्ता ओळखून त्यांना भरभरून मदत केली. अनेकजण या संस्थांशी जोडलेही गेले. अनेकांना सत्पात्री दानाचे समाधानही लाभले.  
आता उपक्रमाच्या या चौथ्या वर्षांसाठी उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या दानयज्ञात आणखी दहा संस्थांच्या कार्याचा परिचय वाचकांना होईल. त्यातून या दानयज्ञात वाचक दानरूपी आहुती टाकतीलच या अपेक्षेसह.. सर्वकाय्रेषु सर्वदा..