गुरुत्वतरंगांचे अस्तित्व शोधून काढल्याची ऐतिहासिक घोषणा नुकतीच अमेरिकेच्या लायगो प्रकल्पाअंतर्गत करण्यात आली. त्यात भारताच्या ‘इंडिगो टीम’चाही मोठा सहभाग होता. या चमूचे नेतृत्व आयुकाचे वैज्ञानिक डॉ. सुकांत बोस यांनी केले. पण त्याआधी गुरुत्वतरंगांचे मापन करण्याच्या पद्धतींबाबतचे पायाभूत संशोधन याच संस्थेतील वरिष्ठ वैज्ञानिक व मानद प्राध्यापक डॉ. संजीव धुरंधर यांनी केले होते. ‘लायगो’ प्रकल्पात ज्या भारतीय संशोधकांनी लक्षणीय कामगिरी बजावली, त्यात त्यांच्या विद्यार्थिनी डॉ. अर्चना पई यांचाही समावेश होता. गुरुत्वतरंगांच्या या शोधाच्या निमित्ताने डॉ. धुरंधर आणि डॉ. अर्चना पई यांच्याशी साधलेला संवाद..

* तुम्ही गुरुत्वीय लहरी शोधक यंत्र बसवण्याची कल्पना मांडली होती. त्याचे नंतर काय झाले?
– गुरुत्वीय लहरी शोधक यंत्र (डिटेक्टर) तयार करण्याची कल्पना बंगळुरू येथे संशोधन करीत असतानाच मी मांडली होती. ती काही कारणाने प्रत्यक्षात आली नाही. त्यानंतर २५-३० वर्षांपूर्वी जयंत नारळीकर, अजित केंभावी, नरेश दधिच व मी नियोजन आयोगाच्या बैठकीला गेलो होतो. गुरुत्व लहरीवरील संशोधन प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात यावा यासाठी स्वतंत्र निधीची मागणी आम्ही केली होती, त्यावर गुरुत्वीय लहरींचा शोध लागणे शक्य तरी आहे का, असा उलटा प्रश्न आम्हाला करण्यात आला. नोकरशाहीचा तो एक कटू अनुभव होता पण तरीही आम्ही नाउमेद झालो नाही कारण वेगळे काही करायचे असेल तर लोक त्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत, त्यावेळी तंत्रज्ञानही फार पुढे गेलेले नव्हते त्यामुळे असे अनुभव आले त्यात काही वेगळे होते असेही नाही, यातून आम्ही आहे त्या स्थितीतही चांगले काम करून दाखवले याचा सार्थ अभिमान आहे.
* लायगो इंडिया प्रकल्पात भारताचा सहभाग नेमका काय आहे?
– गुरुत्वीय लहरींच्या मापनासाठीच्या काही पद्धती आम्ही विकसित केल्या, त्यासाठी वेगवेगळ्या टेम्पलेट्स लागतात त्या तयार केल्या कारण अवकाशातून येणाऱ्या या लहरी फार वेगवेगळ्या असतात. अमेरिकेत हॅनवर्ड व लिव्हिंगस्टोन येथे दोन लायगो डिटेक्टर आहेत ते एल आकारातील दोन अजस्त्र बाहू आहेत, त्यांच्या मदतीने गुरुत्वीय लहरींचे संशोधन सुरू करण्यात आले. आयुका ही संस्था त्यात इ.स. २००० पासूनच सहभागी झाली. त्यावेळी रामन इन्स्टिटय़ूटमध्ये बाला अय्यर व आयुकात मी काम करीत होतो. लेसर इंटरफेरोमीटर स्पेस अँटेना म्हणजे लिसाच्या मदतीनेही आम्ही पॉलिनॉमियल रिंग ऑफ टाइम डिले ऑपरेटर्स या संकल्पनेवर संशोधन केले. माझ्यासह अनेक वैज्ञानिकांनी या डिटेक्टरनी दिलेल्या माहितीचे विश्लेषण केले, त्यासाठी बुद्धिमान वैज्ञानिकांची टीम तयार केली. एन. सेनगुप्ता यांनी याबाबत अधिकृत सहकार्याचा प्रस्ताव २००९ मध्ये मांडला, तेव्हापासून आम्ही भारतीय लायगो प्रकल्पात काम करीत आहोत. यापूर्वी गुरुत्वीय लहरींबाबत केवळ संगणकीय माहिती किंवा सिद्धांत होते पण प्रत्यक्ष प्रयोगातून ठोस माहिती मिळवण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. अमेरिकेतील उपकरणातून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम आम्ही करीत होतो.
* प्रा. विश्वेश्वरा यांनी १९७० च्या सुमारास कृष्ण विवरांबाबत नेमके काय सांगितले होते ?
– डॉ. विश्वेश्वरा हे माझे मार्गदर्शक आहेत. गुरुत्वीय लहरींचा शोध जाहीर करण्यात आला तेव्हा आयुकाच्या सभागृहात ते आवर्जून उपस्थित होते. त्यांनी त्या काळात असे सांगितले होते की, जेव्हा कृष्णविवराजवळून एखादी वस्तू जाते किंवा त्यात पडते तेव्हा निम्न साधारण स्थिती तयार होते त्यामुळे त्यातून काही स्पंदने किंवा लहरी ऊर्जेच्या रूपात बाहेर पडतात. त्याच गुरुत्वीय लहरी असतात. आता प्रा. विश्वेश्वरा यांचे हे भाकित खरे ठरले आहे. कृष्णविवरे एकमेकांभोवती फिरता फिरता एकमेकांत मिसळतात तेव्हाही असेच घडते. आइन्स्टाइनने कृष्णविवरांचे मीलन होते असे पूर्वीच सांगितले होते. यात नोबेल पारितोषिक विजेते सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांनीही मोठे काम केले. कृष्णविवरांचे मीलन झाल्यानंतर जे एकच कृष्णविवर तयार होते ते स्पंदित होते, त्याची स्थिती दोलायमान असते.
* गुरुत्वाच्या संशोधनाचा जीपीएसशी काही संबंध आहे का ?
– आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या विशेष व सर्वसाधारण सिद्धांतावर जीपीएस काम करते. यात गुरुत्वाच्या अभ्यासाने काही एकक पातळीवरील दुरुस्त्या करता येतात. आपले पृथ्वीवरचे घडय़ाळ व उपग्रहाचे घडय़ाळ यात फरक असतो. जीपीएस ही उपग्रह संदेशांच्या माध्यमातून काम करते त्यामुळे वेळातील हा थोडा फरकही एखाद्या वस्तूच्या स्थाननिश्चितीच्या आपल्या आकलनात त्रुटी निर्माण करू शकतो. पूर्वी ध्रुवतारा किंवा सप्तर्षीच्या मदतीने दिशा ओळखल्या जात असत. आता उपग्रह आपल्याला यात मदत करतात. तुम्ही नेमके कुठे आहात हे त्यामुळे समजते. उपग्रह फिरत असतो त्याच्यावरही गुरुत्व काम करत असते व पृथ्वीवरही गुरुत्वीय बल असते त्यामुळे वर सांगितलेल्या दोन घडय़ाळांमध्ये दिवसाला ४५ मायक्रोसेकंदांचा फरक पडतो व विशेष सापेक्षता सिद्धांताच्या आधारे विचार केला तर दिवसाला ७ मायक्रो सेकंदांचा फरक पडतो. पण त्यांची दिशा वेगवेगळी असल्याने वजाबाकी होऊन दिवसाला एकूण ३८ मायक्रोसेकंदांचा फरक वेळेत पडतो, असा फरक हा खूप कमी वाटत असला तरी त्यामुळे उपग्रहाच्या जीपीएस प्रणालीने शोधलेले स्थान १० कि.मी.ने चुकू शकते. त्यामुळे वेळेतील त्रुटी दुरुस्त कराव्या लागतात, त्यासाठी गुरुत्वाचा अभ्यासही महत्त्वाचा आहे.

मुलाखत – राजेंद्र येवलेकर