गुरूत्वतरंगाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या खगोलशास्त्रीय शोधमोहिमेत- ‘लायगो सायंटिफिक प्रोग्राम’मध्ये ज्या भारतीय वैज्ञानिकांनी आपले अमूल्य योगदान दिले, त्यात बिनीचा वाटा मूळच्या मुंबईकर असलेल्या मराठमोठय़ा डॉ. अर्चना पई यांचाही आहे. इंडिगो (इंडियन इनिशिएटिव्ह इन ग्रॅव्हिटेशनल ऑबझव्‍‌र्हेटरी) अंतर्गत ज्या ९ भारतीय विज्ञान संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या, त्यांच्या प्रमुख विश्लेषकांमध्ये (प्रिन्सिपल इन्वेस्टिगेटर)त्या एकमेव महिला वैज्ञानिक आहेत. ‘गुरुत्व तरंगांचे अस्तित्त्व सुस्पष्ट करणारा आणि द्वैती कृष्णविवरांचे अस्तित्त्वही सिद्ध करणारा तो क्षण अत्यानंदाचा आणि आत्यंतिक समाधान देणारा होता,’ असे उद्गार डॉ. अर्चना पई यांनी लोकसत्ताशी बोलताना काढले.
१६ देशांमधील एक हजार वैज्ञानिक लायगो मोहिमेअंतर्गत गुरुत्वतरंगांच्या अस्तित्त्वाचा शोध घेत होते. गुरुत्वतरंगाचे अस्तित्त्व शोधण्याकरता अमेरिकेतील वॉशिग्टन येथे आणि हॅम्फर्ड येथे प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या होत्या, ज्यात लायगो डिटेक्टर्स उभारण्यात आले होते. अत्यंत कमकुवत असणाऱ्या गुरुत्वीय लहरींचे मापन करण्यासाठी बनविण्यात आलेले लायगोचे अद्ययावत व्हर्शन म्हणजे मानवाने आजमितीस बनवलेले सर्वात अद्ययावत साधन मानायला हवे असे सांगतानाच डॉ. पई म्हणाल्या की, खऱ्या अर्थाने जागतिक असलेल्या या मोहिमेत कुठेही स्पर्धा नव्हती. माहितीच काय, कोडस्चेही आदानप्रदान होत होते. ‘विश्वाचे आर्त’ उलगडणाऱ्या या शास्त्राचे स्वरूपच असे होते, की जिथे आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य आवश्यक होते. भारतातील जे निवडक वैज्ञानिक ‘गुरुत्वीय तरंग’ या विषयावर आधीपासून संशोधन करीत होते, त्यांनी २००९ मध्ये ‘इंडिगो’ हा गट स्थापन केला आणि या गटाने ‘आम्हालाही लायगो संशोधन उपक्रमात सहभागी व्हायचे आहे,’ असे लायगोला कळवले. २०१२ साली ‘इंडिगो एलएससी’ (लायगो सायंटिफिक कोलॅबरेशन) अंतर्गत भारतातील ९ विज्ञान संस्था या मोहिमेत सहभागी झाल्या. त्यात आयसर त्रिवेंद्रम, आयसर कोलकाता, आयसर चेन्नई, आयुका, आयपीआर प्लाझ्मा रिसर्च, टीआयएफआर मुंबई, आयसीटीएस- टीआयएफआप बंगळुरू, आरआरसीएटी, आयआयटी गांधीनगर या संस्थांचा सहभाग होता. यातील काही संस्था या इंस्ट्रमेन्टेशन संबंधी तर काही मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणाचे काम करत होत्या. या मोहिमेत भारतीय वैज्ञानिकांची मोट बांधण्यात आयुकाचे डॉ. संजीव धुरंदर आणि बंगळुरूच्या रामन इन्स्टिटय़ूटचे जॉ. बाला अय्यर यांचे लाखमोलाचे योगदान आहे. डॉ. धुरंदर यांनी माहितीचे विश्लेषण आणि डॉ. अय्यर यांनी बायनरी स्रोताची दिशा शोधणारी सिग्नल यंत्रणा विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली असल्याचेही डॉ. पई यांनी सांगितले.
या संशोधनाने ‘गुरुत्वीय तरंग’ या संशोधनाचे स्वतंत्र क्षेत्र म्हणून खुले झाल्याचे डॉ. पई यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या, ‘गुरुत्वीय तरंगांचे अस्तित्त्व सिद्ध करणाऱ्या या यशामुळे या संबंधित संशोधनाकडे वळण्याची प्रेरणा अनेक युवा संशोधकांना नक्कीच मिळेल. गुरुत्व तरंगांच्या अस्तित्त्वाचा शोध घेणारे जितके जास्त डिटेक्टर असतील आणि ते परस्परांपासून जितके दूर असतील तितके उत्तम. कारण कृष्णविवरांची टक्कर झालेला स्रोत नेमका शोधण्यासाठी लांब अंतरावरील डिटेक्टर्स उपयोगी पडतील. यात हेही लक्षात घ्यायला हवे की, मूलभूत संशोधन जिथे विकसित होत असते, तिथे विज्ञानाला सहाय्यकारी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित होत असते आणि त्यावेळी देशातील तंत्रज्ञानही आपोआप अद्ययावत होते. अशा तऱ्हेने मूलभूत संशोधनाचा थेट फायदा हा सामान्य व्यक्तीलाही होत असतो. अगदी साधे उदाहरण म्हणजे ‘जीपीएस’ फोनप्रणालीचे. ही प्रणाली सापेक्षतावादाच्या सिद्धांतावरच आधारित आहे, हे लक्षात घ्यायला हवे.’ आजही आपला युवावर्ग म्हणावा तितका संशोधन क्षेत्राकडे वळत नाही, याबाबत विचारले असताना डॉ. अर्चना यांनी सांगितले की, संशोधनाचे क्षेत्र हे चित्तथरारक, आव्हानात्मक आणि तितकेच समाधान देणारे क्षेत्र आहे. युवावर्गाला संशोधनाकडे वळायला उत्तेजन मिळायला हवं आणि युवक-युवतींनीही करिअर निवडताना संशोधनाचा गांभीर्याने विचार करायला हवा. संशोधन क्षेत्रात खरेच काही करून दाखवायचे असेल तर मेहनत आणि सातत्याला पर्याय नाही. आज आपल्या देशात संशोधनाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत आणि संशोधकांना मिळणारे वेतनही उत्तम आहे. ही सारी अनुकूल परिस्थिती असतानाही आज आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत संशोधकांची संख्या अत्यंत नगण्य आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
‘लायगो’च्याच धर्तीवर गुरूत्व तरंगाच्या संशोधनासाठी युरोपात जी वर्गो (जी व्यवस्था आता अद्ययावत होत आहे) प्रणाली विकसित करण्यात आली होती, त्यातही डॉ. अर्चना यांचा खारीचा वाटा आहे. गुरूत्वीय लहरींवर गेली १८ वर्षे काम करणाऱ्या डॉ. अर्चना पई २००२-२००३ दरम्यान फ्रान्समध्ये आणि त्यानंतर २००६ पर्यंत रोममध्ये वर्गो प्रणालीसोबत काम केले होते. २००९ साली त्या भारतात परतल्या आणि आयसर- त्रिवेंद्रम येथील स्कूल ऑफ फिजिक्समध्ये त्या प्राध्यापक आणि संशोधक म्हणून रुजू झाल्या. डॉ. अर्चना पई यांचे वैशिष्टय़ हे की त्यांनी हे अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन अध्यापन करताना केले आहे. याबद्दल त्या म्हणतात, परदेशात संशोधन याच पद्धतीने होते आणि आपल्याकडेही हाच पायंडा पडायला हवा. अध्यापन आणि संशोधन एकत्र केल्याने अनेक विद्यार्थी या क्षेत्राकडे आकर्षित होतात. संशोधनाचा अनुभव शेअर केल्याने ते अधिक समृद्ध होते. मात्र घर, अध्यापन आणि संशोधन अशा तिहेरी आघाडय़ा सांभाळताना कसरत होते. गेले दोन-तीन महिने अधिक थकवणारे होते. डॉ. अर्चना यांचे पती डॉ. एस. शंकरनारायणन हेदेखील आयसर त्रिवेंद्रम येथील स्कूल ऑफ फिजिक्समध्ये प्राध्यापक आणि संशोधक आहेत. ब्लॅक होल फिजिक्स आणि कॉस्मोलॉजी हा डॉ. एस. शंकरनारायणन यांचा संशोधनाचा विषय आहे. पती आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा ऋषी यांचे संपूर्ण सहकार्य माझ्या व्यग्र वेळापत्रकात लाभल्याचेही डॉ. अर्चना यांनी आवर्जून नमूद केले.
दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमातील मुलींची शाळा क्र. २ या शाळेत शिकलेल्या अर्चना पई या दहावीत गुणवत्ता यादीत चमकल्या होत्या. रुपारेल महाविद्यालयातून पदार्थविज्ञानशास्त्रातून बीएस्सी केल्यानंतर आयआयटी- मुंबईमधून त्यांनी एमएस्सी केले. त्यानंतर पुण्याच्या आयुकामध्ये त्यांनी पदार्थविज्ञानशास्त्रात पीएच.डी मिळवली. त्यांना पोस्ट डॉक्टरेटसाठी फ्रान्सच्या हेन्री पॉइन्कारे स्कूलची शिष्यवृत्ती मिळाली.
युनिव्हर्सिटी ऑफ रोममध्ये दोन वर्षे पई यांना संशोधनाची संधी मिळाली. २००५ ते २००७ दरम्यान त्यांना जर्मनीच्या अल्बर्ट आइन्स्टाइन संस्थेत संशोधनाची संधी प्राप्त झाली. डॉक्टरेट मिळवल्यानंतरच्या कार्यकाळात त्या गुरुत्व तरंगांबाबत संशोधन करत होत्या. ‘लायगो’ मोहिमेतील यशाने त्यांच्यासह गुरूत्व तरंग या विषयात संशोधन करणाऱ्या संशोधकांचे मनोबल अधिक वाढले आहे.

– सुचिता देशपांडे
suchita.deshpande@expressindia.com