एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या शेजारील आसन रिक्त झाले. खडसे हे विधान परिषदेतील गटनेते होते, त्या जागी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळात पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या यादीत पाटील यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील मंत्र्याचे आसन सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असते, अशी परंपरा आहे. विधान परिषदेत तशी रचना आहे. खडसे यांच्या राजीनामा आणि नवीन मंत्र्यांच्या समावेशानंतर विधानसभा सभागृहातील नव्या आसन व्यवस्थेत मुख्यमंत्र्यांच्या शेजारील जागा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना देण्यात आली आहे. साहजिकच विरोधी सदस्यांनी चंद्रकांतदादांना सभागृहाच्या बाहेर छेडले. ‘दादा तुम्ही आता दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री, मग मागे कसे’, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर विधिमंडळ सचिवालयाने केलेल्या वाटपानुसार आपण पहिल्या रांगेतील नवव्या आसनावर बसतो, असे दादांनी सांगितले. ‘मुख्यमंत्र्यांच्या शेजारील आसनाखाली काही जण आपल्या पादुका ठेवून गेले आहेत’, अशी मल्लिनाथी एका मंत्र्याने तेवढय़ात केली आणि एकच हशा पिकला. हा रोख अर्थातच खडसे यांना उद्देशून होता.

 

जयंत पाटील यांची तिरकी चाल

सभागृहात बोलताना समोरच्या नेत्यांच्या टोप्या उडविणे हे एक कसब असते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यात माहीर होते. हे कसब आता जयंत पाटील यांनी आत्मसात केले आहे. विरोधी बाकावरून सत्ताधाऱ्यांना उचकावणे हे एक आव्हान असते. अधिकाऱ्यांच्या उद्दामपणाबद्दल सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींमध्ये तिडीक असतेच. जयंत पाटील यांनी त्याला वाट करून दिली. सध्या नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांची चांगलीच जुंपली आहे. ‘बिचाऱ्या मंदाताई, सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्या तरी अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत’ वगैरे वगैरे जयंतरावांनी सुरू केले आणि हळूहळू भाजपच्या आमदारांमधील घुसमट बाहेर पडली. अधिकाऱ्यांच्या उद्दामपणाबद्दल जयंतराव बोलत होते आणि बघता बघता सत्ताधारी भाजपच्या आमदारांकडूनच त्यांना दाद मिळत गेली. सत्ताधारी आमदारांना सरकारच्या विरोधात उचकविण्याची जयंतरावांची तिरकस चाल यशस्वी झाली.

 

काजवे चमकले..

विधान परिषदेत नारायण राणे यांनी मंगळवारी सत्ताधारी पक्षाची अक्षरश: पिसे काढली, तेव्हा काँग्रेसच्या सदस्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. त्याआधी राणे यांनी काँग्रेसच्या आमदारांचा एक अभ्यास वर्गही घेतला होता, असे म्हणतात. ‘अजिबात घाबरू नका, रेटून आरोप करा, सरकारला आव्हान द्या.. पुढचे पुढे’, असा अनुभवाचा सल्लाही त्यांनी दिला तेव्हा अनेकांच्या मनात काजवे चमकले होते. नंतर राणेंची तोफ सभागृहात धडाडली, तेव्हा मात्र सर्वाना दिलासा मिळाला. आता आपणही आक्रमक व्हावे, असेही अनेकांना वाटू लागले होते. काहींनी विधान भवनाच्या ग्रंथालयात बैठक मारली, तर काहींनी जुनी इतिवृत्ते चाळण्याचा सपाटा लावला. सध्याच्या मंत्र्यांची विरोधी पक्षात असतानाची भाषणे शोधून त्यातील ‘कामाची’ वाक्ये ‘अंडरलाइन’ करण्याचे काम करताना ‘पीए’ लोकांची दमछाक झाली. आता उभे अधिवेशन गाजवायचेच, असे अनेकांनी ठरवलेही होते. पण बुधवारी मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्या मुद्दय़ांचा समाचार घेताना ‘संयमी’ अवतार दाखविला आणि विरोधी बाकांवरील आमदारांची चुळबुळ सुरू झाली. राणे यांच्या सल्ल्यानुसार आक्रमक व्हायचे की नाही, यावर आता गटागटाने विचारविनिमय सुरू आहे, असे समजते.

 

तावडेंकडून बर्थ डेगिफ्ट हवे

विधानसभेत मुंबईतील महाविद्यालयीन प्रवेशाच्या निर्माण झालेल्या गंभीर समस्यांची चर्चा सुरू होती. भाजपचेच राज पुरोहित हे शिक्षण खात्याच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत होते. अगदी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळत नसल्याने निराश झालेले विद्यार्थी व पालक आमदारांकडे हेलपाटे घालत आहेत. त्यांना उत्तरे देता देता मला ‘स्पॉिडलायसिस’ झाला व पट्टा वापरावा लागत आहे. आता हेल्मेटच घालावे लागेल, अशी टिप्पणी पुरोहित यांनी केल्यावर सभागृहात सर्वानाच हसू आवरणे कठीण गेले. आमदारांची शान राखण्यासाठी त्यांना महाविद्यालयीन प्रवेशामध्ये १० टक्के तर स्थानिक विद्यार्थ्यांना ५० टक्के कोटा देण्याची मागणी त्यांनी केली. ती करताना पुरोहित यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा आज वाढदिवस असल्याचे औचित्य साधले. मुलांना आणि आमदारांना वाढदिवसाची ही ‘गिफ्ट’ द्याच अशी गळ पुरोहित यांनी घातल्यावर सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.