विरोधी पक्षात असताना केलेली विधाने सत्तेत आल्यानंतर कशी अंगाशी येऊ शकतात याचा अनुभव शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आला. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी आघाडी शासनाच्या काळात जेव्हा विधेयक मांडण्यात आले होते तेव्हा तावडे यांनी त्याचा जोरदार विरोध करताना एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून सरकार बहुसदस्यीय प्रभागाचा पोरखेळ करत असल्याची टीका केली होती. आता भाजप सरकारनेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला आहे. त्याचा समाचार घेताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्षात असताना तावडे यांनी जे भाषण केले तेच वाचून दाखवत सरकारची व तावडे यांची पंचाईत केली. केवळ तावडेच नव्हे तर गिरीश बापट यांनीही सत्तेसाठी आघाडी सरकार हे विधेयक आणून जनतेला वेठीस धरत असल्याची टीका तेव्हा केल्याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. सर्वात कडी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही २०११ मध्ये या बहुसदस्य प्रभाग पद्धतीला विरोध करताना हे विधेयक पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक असल्याची टीका केली होती, असे सांगून हे विधेयक तेव्हा विचारपूर्वकच मांडण्यात आले होते, तो पोरखेळ नव्हता, असा टोला तावडे यांना लगावला. या विधेयकामध्ये नगरपालिकांसाठी चार प्रभागांचा एक गट आणि महापालिकांसाठी दोन प्रभागांचा एक गट केल्यास आम्ही निश्चितपणे समर्थन देऊ, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘हम किसी से कम नही’ असे दाखवून दिले.

 

डाळ महाग, मग कोंबडी खा !

राज्यातील युती सरकारमधील काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर गेल्या दोन दिवसांपासून विधान परिषदेत चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचाराबरोबर भाजप-शिवसेनेने निवडणुकीत महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सत्तेवर आल्यानंतर या पक्षांना त्याचा विसर पडल्याची टीका विरोधी सदस्यांकडून करण्यात आली. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी वाढत्या महागाईचा मुद्दा हिरिरीने मांडला. गगनाला भिडलेल्या महागाईमुळे गरिबांच्या जेवणातून डाळ नाहीशी झाली आहे. त्यामुळे आता डाळ परवडत नाही तर, कोंबडी खा, असे सर्वसामान्यांना सांगायची वेळ आली आहे. महागाईचे गाऱ्हाणे घेऊन फ्रेंचची जनता राजाकडे न्याय मागायला गेली होती, तर त्या वेळी पाव (भाकरी) परवडत नसेल तर केक खा, असा सल्ला राणीने दिला होता. त्यावर उसळलेल्या जनक्षोभाने फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणली. डाळ परवडत नाही तर कोंबडी खा, हे रघुवंशी यांचे महागाईच्या धगीची जाणीव करून देणारे विधान, फ्रेंचच्या राणीच्या जनक्षोभाला आमंत्रण देणाऱ्या त्या सल्ल्याची आठवण करून देणारे होते.

 

सामाजिक न्याय मंत्री

समाजातील मागास आणि तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याचे काम करणारा सामाजिक न्याय विभाग कधी शिष्यवृत्ती घोटाळ्यावरून, तर कधी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे, तर कधी जात प्रमाणपत्रांच्या घोळावरून, तर कधी या खात्याच्या मंत्र्यांमधील विसंवादामुळे चर्चेत असतो. आश्वासनांच्या पलीकडे काही न करण्याच्या वृत्तीमुळे आज पुन्हा एकदा या विभागाच्या कारभारावर विधान परिषदेत जोरदार चर्चा रंगली. तेव्हा हा सामाजिक न्याय आहे की अन्याय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. राज्यातील नॉन क्रिमी लेअर प्रवर्गाची उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून केवळ आश्वासनांच्या हिंदोळ्यावरच अडकून पडला आहे. आज पुन्हा एकदा हा प्रश्न सभागृहात उपस्थित होताच सत्ताधारी पक्षाच्याच सदस्यांनी हे सामाजिक न्याय की सामाजिक अन्याय मंत्री आहेत, अशी विचारणा करीत घरचा आहेर दिला.या विभागाचे नावच सामाजिक अन्याय असे करा, अशा संतप्त भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. तेव्हा पुढील अधिवेशनात तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागणार नाही, अशी मलमपट्टी करीत मंत्र्यांनी वेळ मारून नेली.

 

नाजूककारणांमुळे अदलाबदल?

मंत्र्यांचे स्वीय साहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) हे बडे प्रस्थ. त्यांच्या ‘कामगिरी’मुळे मंत्रीही अडचणीत येतात. एका ज्येष्ठ मंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकाने बरेच उद्योग केल्याची चर्चा आहे, तर एक मंत्री विदेशात असताना त्यांच्या लेटरहेडवर चक्क स्थगिती आदेशच स्वीय साहाय्यकांनी देऊन टाकले. त्यामुळे स्वीय साहाय्यक हा मंत्र्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा व विश्वासूच असावा लागतो. नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यात काही मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल झाली. त्याच पद्धतीने स्वीय साहाय्यकांचाही खांदेपालट झाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे अमित गोळे हे विशेष कार्य अधिकारी म्हणून गेली अनेक वर्षे काम पाहात होते, पण गेल्या दीड-दोन महिन्यांपासून त्यांना दूर करण्यात आले होते, तर आता आणखी एक विशेष कार्य अधिकारी विद्याधर महाले यांनाही बदलण्यात आले आहे. महाले हे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे, तर अमित गोळे हे कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्याकडे दाखल झाले आहेत.