विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आकर्षण अर्थातच एकनाथ खडसे आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा दावा ते करीत असले तरी पक्षाने त्यांचा राजीनामा मागितल्याची चर्चा आहे. खडसे यांनी भाजपला अडचणीत आणावे, असा विरोधकांचा प्रयत्न असतो. गेल्या आठवडय़ात खडसे उपाख्य नाथाभाऊंनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे खडसावले. ‘कोणी गल्लीतील आरोप केले आणि आम्ही एवढे संवेदनशील की कोणतेही पुरावे नसताना राजीनामा द्यावा लागला’ अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. ‘कोठे आणि कोणाशी बोलू’, असा प्रश्न पडला होता, पण विरोधकांनी कलंकित मंत्र्यांचा विषय मांडला आणि आपल्याला बोलण्याची संधी मिळाली, असे ‘मनोगत’ व्यक्त करून खडसे यांनी विरोधकांचे जाहीरपणे सभागृहात आभारही मानले. अध्यक्षपदावरील तालिका सदस्य योगेश सागर यांच्या वर्तनावरून सभागृहात गदारोळ झाला आणि दोनदा कामकाज तहकूब झाले. कामकाज तहकूब झाले असताना खडसे चक्क विरोधी बाकांवर पोहोचले. विरोधी सदस्यांशी हस्तांदोलन आणि हास्यविनोद करीत होते. थोडा वेळ राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याशी हितगुज केले. नाथाभाऊ विरोधी बाकांवर पोहोचल्याने भाजपच्या सदस्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाथाभाऊ जेवढे मोकळे राहतील तेवढे पक्षासाठी तापदायकच ठरणार, अशी प्रतिक्रिया भाजपच्या गोटात आहे.

जळगावचे पालकत्व कोणाकडे?

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले जळगावचे पालकमंत्रिपद मंत्रिमंडळ विस्तार पार पडूनही अजून कोणाच्याही वाटय़ाला आलेले नाही. गिरीश महाजन यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रिपद जाऊ नये, असा खडसे यांचा प्रयत्न आहे. आपल्या विश्वासातील सहकाऱ्याकडे ते असावे, असे नाथाभाऊंना वाटत असल्याने राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण खडसे यांना दुखावून महाजन यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रिपद द्यावे की नाहीत, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडला असल्याने निर्णय लांबलेला आहे. हा निर्णय १५ ऑगस्टनंतर होणार असल्याचे समजते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांऐवजी अन्य मंत्र्यांकडून किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून झेंडावंदन कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठका घेण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पण दबावाच्या राजकारणामुळे जळगाव जिल्ह्य़ाला अजून पालकमंत्री लाभलेला नाही.