भाजप म्हणजे शिस्तप्रिय पक्ष, असा दावा पक्षाच्या नेत्यांकडून केला जातो. अर्थात, हा सोयीनुसार अर्थ लावला जातो, ही बाब निराळी. संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपच्या खासदारांची बैठक आयोजित केली जाते. बैठकीच्या निश्चित केलेल्या ठोक्याला संसदेतील पक्षाच्या कार्यालयाचे दरवाजे बंद केले जातात. मागे विलंबाने येणाऱ्या खासदारांची कानउघडणी करण्यात आली होती. त्यात राज्यातील पूनम महाजन, प्रीतम मुंडे या खासदारांचा समावेश होता.  मुंबईतही भाजपने हाच प्रयोग सुरू केला. बुधवारी पक्षाच्या आमदारांची विधान भवनातील दहाव्या मजल्यावरील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. सकाळी ९ ते ९.३० नाश्ता, ९.३० ते ९.४५ बैठकीच्या ठिकाणी प्रवेश व नोंदणी, असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. बरोबर पावणे दहाच्या ठोक्याला पक्षाचे प्रतोद राज पुरोहित यांनी दरवाजे बंद करून घेतले आणि स्वाक्षरीची वहीही काढून घेतली. परिणामी पाच मिनिटे विलंबाने आलेल्या सदस्यांचा नाइलाज झाला. गिरीश महाजन हे मंत्री, काही आमदारांना विलंबाने आल्याने प्रवेश देण्यात आला नाही. फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्वनियोजित बैठकीमुळे थोडे विलंबाने आले आणि त्यांच्यासाठीच फक्त दरवाजे उघडण्यात आले. मंगळवारी मध्यरात्री साडेबारापर्यंत कामकाज चालविण्यात आले. त्यामुळे थोडा विलंब झाला, असा युक्तिवाद काही आमदारांनी केला. गुरुवारी रात्री पक्षाच्या आमदारांकरिता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पक्ष संघटनेचा आढावा तेव्हा घेतला जाणार होता. रात्री आठची वेळ देण्यात आली होती. आदल्या दिवशीचा अनुभव लक्षात घेता बहुतांशी मंत्री आणि आमदार आठच्या आधीच पोहचले.  दिल्लीत नरेंद्र जे करतात त्याचीच री मुंबईत देवेंद्र ओढतात, अशी भाजपच्या आमदाराने व्यक्त केलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.

आमदाराचे फोटोसेशन

अधिवेशनाचा आठवडय़ाचा शेवटचा दिवस म्हणजे कामकाज लवकर उरकण्याचा असतो. मुंबई बाहेरच्या आमदारांना आपापल्या गावाला किंवा मतदारसंघात जाण्याचे वेध लागलेले असतात. त्यानुसार आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सभागृहाच्या कामकाजाचे वेळापत्रक ठरविले जाते.  शुक्रवारी मात्र स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी  भाजपला धारेवर धरले आणि त्यामुळे झालेल्या गोंधळात दुपारीच दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित झाले. मुंबई बाहेर जाणारे आमदार निघून गेले, परंतु मुंबईतील आमदार विधान भवनाच्या परिसरातच भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांचा पाहुणचार करत, गप्पा झोडत विधान भवनाच्या परिसरातच रेंगाळत होते. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी तर, आपल्या कार्यकर्त्यांबरोबर बराच वेळ फोटोसेशन सुरू केले. आपल्या साहेबांबरोबर फोटो काढायला मिळतो, म्हटल्यानंतर मग काय, ही झुंबड उडाली.  काय गडबड झाली की काय, म्हणून विधान भवनात येणारी आणि जाणारी वर्दळ क्षणभर थांबून पुढे सरकत होती. आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याची गंधवार्ताही नव्हती.