सहभाग नोंदवण्यासाठी २१ नोव्हेंबपर्यंत संधी

महाविद्यालयीन नाटकवेडय़ा तरुणांच्या अभिनयक्षमतेला साद घालणाऱ्या त्यांच्यातील नाटय़प्रतिभेला व्यासपीठाबरोबरच विचारपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २१ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. आतापर्यंत ‘लोकांकिका’ मध्ये सहभागी होण्यासाठी तरुणाईने मोठय़ा संख्येने हजेरी लावली आहे. ‘लोकांकिके’च्या रंगमैदानावर नाटय़विष्कार सादर करण्यासाठी गुणी कलाकारांनी त्वरित स्पर्धेचे अर्ज भरून या भव्य एकांकिकेच्या दरबारात हजेरी लावावी. स्पध्रेची प्रथामिक फेरी २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

राज्यातील कानाकोपऱ्यातील कलाकारांना आपल्यातील कलागुण संपूर्ण जगासमोर दाखविण्याची संधी मिळावी यासाठी स्पर्धेची प्राथमिक फेरी गतवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, रत्नागिरी या आठ केंद्रांवर होणार आहे. नवीन विचार, नवी मांडणी, नवे प्रयोग, सळसळती ऊर्जा या सगळ्यांच्या अजब मिश्रणातून रंगणाऱ्या ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत, ‘झी युवा’, ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे’, ‘केसरी’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. रंगभूमीवर नवे काही सांगू पाहणाऱ्या राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’ने या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पध्रेची सुरुवात केली. पहिल्याच वर्षी राज्यभरातील २००हून अधिक महाविद्यालयांनी आपल्या एकांकिका प्राथमिक फेरीत सादर करत या स्पध्रेचे जंगी स्वागत केले होते. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या व्यासपीठावर पूर्ण तयारीनिशी आपले नाटय़विचार घेऊन उतरणाऱ्या तरुणाईने या स्पध्रेला आपलेसे केले आहे. त्याच आपलेपणाने २६ नोव्हेंबरला ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ‘लोकांकिका’ स्पध्रेची कवाडे नाटय़वेडय़ांसाठी खुली होणार आहेत. यंदाही सर्वोत्तम ठरणाऱ्या गुणवंतांना मालिका-चित्रपटातून संधी देण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’हे या स्पध्रेचे टॅलेंट पार्टनर आहेत. याचबरोबर या स्पध्रेला ‘अस्तित्त्व’चे विशेष सहकार्य लाभले आहे.

‘लोकांकिका’च्या आठही केंद्रांवरच्या प्राथमिक फेरीतून उत्तम एकांकिका त्या विभागांमधील अंतिम फेरीसाठी निवडल्या जातील आणि त्यानंतर विभागीय अंतिम फेरीत पहिली आलेली एकांकिका त्या विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाअंतिम फेरीत दाखल होईल. ही स्पर्धा थोडी उशिरा म्हणजे २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने तरुणाईला परीक्षेचा ताण बाजूला ठेवून पूर्ण जोशाने स्पध्रेवर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. स्पध्रेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्यातील आठ केंद्रांवर प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी पार पडल्यानंतर स्पर्धेची महाअंतिम फेरी यंदा १७ डिसेंबर रोजी रंगणार आहे. त्यासाठी तालमीच्या तयारीला लागण्यापूर्वी ‘लोकांकिका’मध्ये आपल्या महाविद्यालयाची नोंद करणे आवश्यक आहे. स्पध्रेचे प्रवेशिका  www. loksatta. com/lokankika2016 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

untitled-6