महाराष्ट्रभरात सादर झालेल्या १०६ एकांकिका.. त्यातून निवडलेल्या आणि केंद्रीय अंतिम फेरीत पोहोचलेल्या ४० एकांकिका.. या ४० एकांकिकांच्या चुरशीतून सरस ठरलेल्या महाराष्ट्रातील आठ उत्कृष्ट एकांकिका.. महाराष्ट्रातला हा नाटय़जागर उद्या, शनिवारी रवींद्र नाटय़ मंदिर येथे संपणार आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात आठ केंद्रांवरील या एकांकिकांमधून महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ निवडली जाणार आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी ज्येष्ठ नाटककार शफाहत खान, दिग्दर्शक विजय केंकरे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी-मोकाशी परीक्षक म्हणून काम पाहतील. या स्पर्धेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, केसरी टूर्स आणि इंडियन ऑइल यांची मोलाची मदत मिळाली. तसेच अस्तित्त्व या संस्थेच्या सहकार्याने पार पडणाऱ्या या स्पर्धेचे माध्यम प्रायोजकत्त्व झी मराठी नक्षत्र यांचे आहे. आयरिस प्रोडक्शन हे या स्पर्धेत टॅलेंट सर्च पार्टनर आहेत.
रवींद्र नाटय़ मंदिर येथे शनिवारी रंगणाऱ्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या सर्व प्रवेशिका संपल्या असून, आठ उत्कृष्ट एकांकिकांना दाद देण्यासाठी मुंबई, ठाणे, डोंबिवली, पुणे, नाशिक येथील रसिक प्रेक्षक येणार आहेत. तसेच मराठी नाटय़, चित्रपट आणि मालिका या क्षेत्रांतील मान्यवर कलाकारही स्पर्धक महाविद्यालयांचा आणि कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी हजर राहतील. स्पर्धा पार पडल्यानंतर सर्वच स्पर्धकांना आणि होतकरू कलाकारांना ‘रंगभूमीचे विद्यापीठ’ असलेल्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता मार्गदर्शन करणार आहेत.

उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी स्व. विनय आपटे स्मृति पुरस्कार
‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिकेच्या महाअंतिम फेरीतील सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाला विनय आपटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वर्गीय विनय आपटे स्मृति पुरस्कार देण्यात येणार आहे. एकांकिका स्पर्धामधील दिग्दर्शनातूनच छाप पाडत पुढे विनय आपटे यांनी अनेक मालिका, नाटके यांचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या दिग्दर्शनाची शैलीही वेगळी होती. त्यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार स्वर्गीय विनय आपटे यांच्या नावाने दिला जाणार आहे.