‘रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने लोकसत्ता सादर करीत आहे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, लोकांकिका..’ आजपासून महाराष्ट्रातल्या आठ केंद्रांवर ही उद्घोषणा घुमण्यास सुरू होणार असून राज्यभरात एकांकिकांचा नाटय़जागर सुरू होणार आहे. २९ सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये लोकांकिकेची प्राथमिक फेरी होणार असून २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरातील आठ केंद्रांवर प्राथमिक फेरी रंगेल. त्यानंतर ६ ते १३ ऑक्टोबर या काळात या केंद्रांवरील विभागीय अंतिम फेरी पार पडेल आणि १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्राची लोकांकिका निवडली जाणार आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणारी लोकसत्ता लोकांकिका ही स्पर्धा राज्यभरातील आठ केंद्रांवर अस्तित्व या संस्थेच्या मदतीने होत आहे. या स्पध्रेसाठी टॅलेण्ट पार्टनर म्हणून आयरिस प्रोडक्शन आणि नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल यांची साथ लाभली आहे. तर रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र काम सांभाळणार आहेत. या स्पध्रेची प्राथमिक फेरी आज, २९ सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या तापडिया नाटय़मंदिर स्पोर्ट्स हॉलमध्ये सुरू होईल. तरुणांच्या प्रतिभेला पुढे संधी देण्यासाठी आयरिस प्रोडक्शन टॅलेण्ट पार्टनर म्हणून काम पाहणार असून राज्यभरातील आठही केंद्रांवर आयरिस प्रोडक्शनचे प्रतिनिधी प्राथमिक फेरीसाठी उपस्थित असतील. मंगळवारी औरंगाबाद येथे ‘कुलवधू’, ‘पुढचं पाऊल’ मालिकांचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आणि छायाचित्रणकार अभय परळकर हे दोघे आयरिस प्रोडक्शनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असतील.

ठाणे विभागाची प्राथमिक फेरी ३ ऐवजी ६ ऑक्टोबर
ठाणे विभागातील महाविद्यालयांतील नाटय़वेडय़ा तरुणांच्या खास विनंतीनुसार ठाणे विभागाची प्राथमिक फेरी आता ६ऑक्टोबर रोजी होणार आहे. या विभागातील महाविद्यालयांनी काही अपरिहार्य कारणास्तव प्राथमिक फेरीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानुसार ही प्राथमिक फेरी आता ३ ऑक्टोबर रोजी ६ ऑक्टोबरला ठाण्यात ज्ञानसाधना विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे होणार आहे.