विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या नवदुर्गाचा सत्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. मंगळवार, २५ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात हा संगीतमय सत्कार सोहळा होणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.

‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमातील यंदाच्या निवडक नऊ दुर्गाचा सत्कार नाटय़-निर्मात्या लता नार्वेकर, मुंबई जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, दिव्यांग मुलांसाठी गेली ३५ वर्षे कार्यरत कांचन सोनटक्के, नेत्रशल्यविशारद डॉ. रागिनी पारेख, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, शास्त्रीय गायिका देवकी पंडित, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, कविता लाड-मेढेकर आणि मध्य रेल्वेच्या पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांच्या हस्ते होणार आहे.

यंदाच्या निवडक नऊ दुर्गा आहेत, नर्मदा परिसरातील मुलांसाठी शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या भारती ठाकूर, मानवी तस्करी रोखणाऱ्या शर्मिष्ठा वालावलकर, कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ. कल्पना जोशी, देवीचे गाव तुळजापूर स्वच्छ करण्याचा वसा घेतलेल्या भारतबाई देवकर, प्राणिमैत्रीण सृष्टी सोनवणे, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या नासरी चव्हाण, त्याचप्रमाणे स्वत: अंध असूनही इतर अंधांना स्वयंपूर्ण बनवणाऱ्या राधा बोरडे, आदिवासींच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉ. सुजाता गोडा आणि उद्योजिका अनुराधा देशपांडे. या कार्यक्रमाची प्रस्तुती ‘विम’ यांची असून सहप्रायोजक  ‘केसरी’आहेत.

संगीतमय सोहळा

या संगीतमय सत्कार सोहळ्यात सोनिया परचुरे सहनृत्यांगनांसह नृत्य सादर करणार आहेत. तर अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आणि कविता मेढेकर अभिवाचन सादर करतील. मैत्री ढोलपथकाचे वादन आणि चित्रकार शुभांगी सामंत यांच्या रेखाटनांसह इतरही संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहेत. कार्यक्रमाची निर्मिती ‘मिती क्रिएशन्स’ यांची आहे. या कार्यक्रमासाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश असून तुमची उपस्थिती या दुर्गाना नक्कीच प्रेरणादायी असेल.