‘स्वागतम्.. श्री गणेश, रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून लोकसत्ता सादर करत आहे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा.. लोकांकिका’, ही घोषणा मंगळवारच्या अंकातून झाल्यानंतर राज्यभरातील नाटय़रसिकांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. स्पर्धा कधी असेल, स्पर्धेचे स्वरूप काय असेल, नियम-अटी काय असतील, अशा अनेक प्रश्नांचा भडिमार नाटय़रसिकांकडून सुरू झाला आहे. या नाटय़रसिकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा राज्यभरात सात केंद्रांवर होणार आहे.
मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण कोणते, असा प्रश्न विचारला, तर खस्ता खाऊन नाटक करणारा आणि आवडीने नाटक पाहणारा माणूस, हे उत्तर सहज पुढे येईल. महाराष्ट्राच्या याच नाटकवेडाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘लोकांकिका’ हा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा मंच उपलब्ध करून दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा विविध भागांमधील नाटय़वेडय़ांनाही या मंचाचा फायदा व्हावा, यासाठी ही स्पर्धा केवळ मुंबई-पुण्यापुरती मर्यादित न ठेवता राज्यभरात सात केंद्रांवर होणार आहे. मात्र ही स्पर्धा फक्त महाविद्यालयांपुरतीच मर्यादित आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि अहमदनगर या प्रमुख शहरांमध्ये ‘लोकसत्ता’ने आपली घोडदौड कायम राखली आहे. आता ‘लोकांकिका’ ही एकांकिका स्पर्धाही या सात केंद्रांवर होणार आहे. २२ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या दरम्यान ही स्पर्धा रंगेल. प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी आणि महाअंतिम फेरी अशा टप्प्यांत ही स्पर्धा होणार असून या सात केंद्रांवरून प्रत्येकी तीन अशा एकूण २१ विजयी एकांकिका निवडल्या जाणार आहेत. स्पर्धेपुरती चुरस, बक्षिसे एवढय़ापुरतेच सीमित लक्ष्य डोळ्यांसमोर न ठेवता महाराष्ट्रातील या कलेच्या खाणीतील हिऱ्यांना चित्रपट, नाटके, मालिका यांचेही कोंदण लाभावे, हा ‘लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धेचा हेतू आहे.

स्पर्धा केंद्रे
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि अहमदनगर</p>