सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी राज्यभरातून शंभराहून अधिक प्रवेशिका आल्या आहेत. आता ३० नोव्हेंबरपासून राज्यभरात सुरू होणाऱ्या या नाटय़जागरात या सर्व एकांकिकांमधून महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ निवडली जाईल. अस्तित्त्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांना मालिकांचे कोंदण देण्याचे काम या स्पर्धेचे टॅलेण्ट पार्टनर असलेले आयरिस प्रोडक्शन करणार आहे. तर या स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून झी मराठी काम पाहणार आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर लगेचच राज्यभरातून महाविद्यालयांतील नाटय़वेडय़ा तरुणांमध्ये या स्पर्धेबद्दल कुतूहल होते. तसेच अर्ज उपलब्ध होण्यास सुरुवात झाल्यावर पहिल्याच दिवशी विविध केंद्रांवर मिळून ३५ हून अधिक महाविद्यालयांनी अर्ज दाखल केले. २५ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. मंगळवापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी आणि अहमदनगर या आठही केंद्रांवर १०७ अर्ज दाखल झाले. या १०७ एकांकिका ३० नोव्हेंबरपासून विविध केंद्रांवर प्राथमिक फेऱ्यांमध्ये सादर होतील. मान्यवर परीक्षकांनी निवडलेल्या एकांकिका केंद्रीय अंतिम फेरीत सादर केल्या जातील. प्रत्येक केंद्रावर पहिली आलेली एकांकिका २० डिसेंबर रोजी मुंबईतील महाअंतिम फेरीत ‘लोकांकिका’ बनण्यासाठी पुढे येईल. या आठ उत्कृष्ट एकांकिकांमधून एक एकांकिका महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ म्हणून निवडली जाईल.