गिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे, तर शरद उपाध्ये विशेष अतिथी
राज्यभरातील आठ केंद्रांमधून निवडलेले उत्कृष्ट वक्ते.. आठ वेगवेगळे विषय.. आणि एक लक्ष्य.. ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ बनण्याचे! रविवारी मुंबईच्या रवींद्र नाटय़मंदिर येथे रंगणाऱ्या लोकसत्ता वक्तृत्त्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्रेषु’ ठरेल. संध्याकाळी पावणे सहाला सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील वक्त्यांची भाषणे ऐकण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते गिरीश कुलकर्णी, तर विशेष अतिथी म्हणून ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये उपस्थित असतील.
जनता बँक आणि तन्वी हर्बल प्रोडक्ट्स यांच्या सहकार्याने होणारी लोकसत्ता वक्तृत्त्व स्पर्धा पॉवर्ड बाय सिंहगड इन्स्टिटय़ुट्स, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंडियन ऑइल आणि आयसीडी ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा १८ जानेवारीपासून राज्यभरात सुरू झाली. स्टडी सर्कल आणि युनिक अ‍ॅकॅडमी हे या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांच्या अंतिम फेरीतून आठ स्पर्धकांची निवड झाली आहे. या स्पर्धकांची कार्यशाळा होणार आहे. त्यात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.
या महाअंतिम फेरीत आठही स्पर्धक आठ वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडतील. त्यातून सवरेत्कृष्ट ठरणाऱ्या वक्त्याला ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ हा सन्मान, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिक देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता गिरीश कुलकर्णी लाभले असून ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. संध्याकाळी पावणे सहापासून या महाअंतिम फेरीला सुरुवात होणार असून, ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ बनण्यासाठी चुरस आहे.

आठ स्पर्धकांची एकदिवसीय कार्यशाळा
या आठ स्पर्धकांची एक दिवसीय कार्यशाळा आता लोकसत्ताच्या कार्यालयात होणार आहे. या कार्यशाळेत वक्तृत्त्व कलेतील तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाटय़ मंदिर महाअंतिम फेरी रंगेल.