वक्ता दशसहस्रेषुच्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत आदित्य जंगले प्रथम
वक्तृत्व स्पध्रेची तयारी करताना ’लोकप्रिय’ बोलण्यात अडकण्यापेक्षा अभ्यासपूर्वक आणि विषयाच्या खोलात जाऊन तो विषय आत घोळून, पचवून त्यावर डोळसपणे विचार मांडण्याकडे भर दिला पाहिजे. आजच्या तरुणांमध्ये कमालीची सहजता आहे. मात्र उत्तम वक्ता होण्यासाठी ’उत्स्फूर्तते’चीही तालीम करावी लागते’, अशा शब्दांत प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांनी वक्तृत्व कलेचे अभ्यासप्रधान मर्म शनिवारी उलगडले. निमित्त होते ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पध्रेच्या मुंबई विभागीय अंतिम फेरीचे. या फेरीतून रामानारायण रुईया महाविद्यालयाच्या आदित्य जंगले या विद्यार्थ्यांने महाअंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पध्रेच्या मुंबई विभागीय अंतिम फेरीतील विजेत्यांना परीक्षकांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. रुईया महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या माजी प्रमुख प्रा. मीना गोखले, मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या माजी प्रमुख आणि समीक्षक प्रा. पुष्पा राजापुरे-तापस आणि मुंबई विद्यापीठातील नाटय़शास्त्र विभागाचे माजी संचालक आणि नाटककार शफाअत खान यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले. यावेळी तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स’च्या मेधा मेहेंदळे, ‘युनिक अकॅडमी’चे मंगेश खराटे हे स्पध्रेतील वक्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. स्पध्रेचे निवेदन सौरभ नाईक याने केले. मुंबई विभागाच्या अंतिम फेरीसाठी भारत संघराज्य आहे का? कोलावरी ते शांताबाई, पुरस्कार वापसी, शेती की उद्योग, साहित्य संमेलनाने साधते काय? हे पाच विषय देण्यात आले होते.
स्पध्रेतल्या यशापयशापेक्षा स्पध्रेच्या प्रक्रियेतून जाणे महत्त्वाचे असते. वक्तृत्व स्पध्रेत भाग घेताना कोणाचे अनुकरण करू नये, आपण जो विषय मांडतो त्यातून स्वत:ची शैली निर्माण करावी, असे प्रतिपादन प्रा. मीना गोखले यांनी केले. यावेळी त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेतील ‘वक्तृत्व’ या निबंधाचा संदंर्भ देऊन वक्त्याने उत्तम भाषा, विद्वत्ता, बहुश्रुतता आणि अर्थसंगती अशा गुणांचा विकास स्वत:मध्ये करायला हवा, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी समाजामध्ये वरवर असणारी गृहितके मनाशी धरून विचार मांडू नयेत. व्यासपीठावर अभ्यासाशिवाय बोलणे ही गंभीर चूक आहे, असे आपण मानायला हवे. अभिनिवेश म्हणजे वक्तृत्व नव्हे तर उत्तम अभ्यास करून त्यावर विचारपूर्वक बोलावे, असे प्रा. पुष्पा राजापूरे- तापस म्हणाल्या.
स्पध्रेचे हे दुसरे वर्ष असून ‘जनता सहकारी बँक.लि आणि ‘तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स’ हे स्पध्रेचे सहप्रायोजक आहेत. ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’ , ‘मांडके हिअिरग सíव्हसेस’, ‘इंडियन ऑइल’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ यांच्या स्पध्रेस सहकार्य लाभले असून ‘युनिक अकॅडमी’ व ‘स्टडी सर्कल’ या स्पध्रेचे नॉलेज पार्टनर आहेत.

Untitled-13