मागील स्पर्धेच्या विजेत्यांचे मत; १८ जानेवारीपासून राज्यभरातील आठ केंद्रांवर स्पर्धेचे दुसरे पर्व रंगणार
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून उत्तम वक्ते देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेला पहिल्याच वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आत्मविश्वास, समाजात-आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची जाण, चौकसपणा आणि या सगळ्या विचारमंथनातून आपला नवा विचार मांडण्याची तयारी या सगळ्याचाच कस ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेत पाहिला जातो. या स्पर्धेत उतरताना तुमचा आत्मविश्वास आणि विषयांची सखोल तयारी महत्त्वाची आहे, असे मत मागील स्पर्धेच्या विजेत्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राची ओजस्वी वक्त्यांची परंपरा पुढे नेताना नव्या पिढीतून, नवे वक्ते घडवणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन ‘लोकसत्ता’ने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ‘वक्ता दशसहस्रेषु’चे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या या दुसऱ्या पर्वाला १८ जानेवारीपासून सुरुवात होणार असून १४ फेब्रुवारी २०१६ पर्यंत रंगणाऱ्या विविध फेऱ्यांमध्ये राज्यभरातून विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. ‘जनता बँक’ सहप्रायोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा राज्यभरातील आठ प्रमुख शहरांमधील महाविद्यालयांमधून घेण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नागपूर आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडेल. विभागीय प्राथमिक फेरीनंतर, विभागीय महाअंतिम फे रीचे आव्हान पूर्ण करून पुढे येणाऱ्या प्रत्येक केंद्रातील एकेक विद्यार्थी असे आठ विद्यार्थी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फे रीत सहभागी होतील. या आठ जणांमधून महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्रेषु’ निवडला जाणार आहे.
‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या स्पर्धेसाठी निवडण्यात येणारे विषय हे रोजच्याच जगण्यातले असले तरी ते इतर स्पर्धापेक्षा वेगळे असतात, असे मत पहिल्या वर्षी सहभागी झालेल्या स्पर्धकांनी व्यक्त केले आहे. आपल्या विचारांना एक मोठे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी केली पाहिजे. या स्पर्धेत प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीत पोहोचलेल्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शनही मिळते, हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ असले तरी आपल्याला मिळणाऱ्या विषयांची सुसूत्र आणि मुद्देसूद मांडणी करता येणे महत्त्वाचे असल्याचा कानमंत्र गेल्या वर्षीच्या स्पर्धकांनी दिला आहे. नव्या विचारांच्या या मंथनाला लवकरच सुरुवात होणार असून या स्पर्धेच्या अटी, नियम आदी तपशीलही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट्स’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’ आणि ‘इंडियन ऑइल’ पॉवर्ड बाय ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेसाठी ‘युनिक अकॅडमी’, ‘स्टडी सर्क ल’ हे नॉलेज पार्टनर आहेत. या स्पर्धेचे नियम, अटी, विषय आदी तपशीलही ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या माध्यमातून स्पर्धकांपर्यंत पोहोचतील.

विचारांना चालना देणारी स्पर्धा – कविता देवढे (अहमदनगर विभाग)
मला सुरुवातीला ही स्पर्धा इतर वक्तृत्व स्पर्धासारखी वाटली होती, पण पहिली फेरी झाल्यानंतर स्पर्धेचा आवाका लक्षात आला. स्पर्धेसाठी दिलेले विषय तुम्हाला विचार करायला लावणारे होते आणि मुख्य म्हणजे या विषयांना अनेक पैलू होते. त्यामुळे बोलायला खूप मुद्दे असले तरी कमी वेळात प्रभावी मुद्दे मांडण्याचे कौशल्य गरजेचे होते. वक्तृत्वाचे भाषण देताना उगाच बोजड शब्द वापरण्यापेक्षा साध्या व सोप्या पद्धतीने आपले विचार मांडावे या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त होत असता. विषय दिल्यानंतर तुम्हाला फार वेळ दिला जात नाही त्यामुळे अनुभवातून मिळालेले संचित सादर करा. मोठे विचार सांगण्यापेक्षा ज्या गोष्टी आपण अमलात आणू शकतो असे पर्याय द्या. स्पर्धेसाठी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि इतर दिग्गजांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

स्पर्धेसाठी पूर्वतयारी हवीच – नेहा देसाई  (पुणे विभागातून प्रथम)
‘लोकसत्ता’ची वक्तृत्व स्पर्धा ही उच्च पातळीची स्पर्धा आहे. या स्पर्धेचा विस्तार मोठा आणि व्यापक असल्यामुळे प्रत्येक वेळी मिळणाऱ्या अनुभवातून नवे काही शिकता आले. स्पर्धेतील सगळेच स्पर्धक ताकदीचे होते. वेगळे विषय, दर्जेदार स्पर्धक याबरोबरच स्पर्धेच्या तिन्ही फेऱ्यांमधून जाताना खूप शिकायला मिळाले. कार्यशाळेमध्ये वक्तृत्वात होणाऱ्या छोटय़ा छोटय़ा चुकांवर काम करता आले. तिसऱ्या फेरीसाठी मला ‘नेतृत्व आणि मराठीपण’ हा विषय दिला होता. त्या वेळी मी सदानंद मोरेंच्या ‘गर्जा महाराष्ट्र’ या पुस्तकाची मदत घेतली. काही जण विषय समजून घेण्यासाठी इंटरनेटची मदत घेतात, कारण तातडीने तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती हवी असल्यास गुगलचा सहजी वापर केला जाऊ शकतो. पण त्यावर पूर्णत: अवलंबून राहणे चुकीचे आहे. वक्तृत्वाचे विषय मिळाल्यावर विषय समजून घेण्यासाठी संदर्भपुस्तकांची मदत घेणे गरजेचे आहे कारण कुठल्याही स्पर्धेची पूर्वतयारी महत्त्वाची असते आणि तुमचे वाचन चांगले असेल तर तुम्ही तुमचे मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडू शकता. याच वाचनातून तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याचा परिणाम तुमच्या सादरीकरणावर होतो.

स्पर्धा – राज्यभरातील
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता.
कालावधी – १८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी
प्राथमिक फेरीसाठी स्पर्धा केंद्रे –
मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नागपूर आणि रत्नागिरी