महाराष्ट्राला लाभलेली उत्कृष्ट वक्तृत्वाची परंपरा अधिक जोमाने पुढे चालू ठेवण्यासाठी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यांत दडलेल्या तरुण वक्त्यांना शोधून त्यांच्या भाषणकौशल्याला वाव देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून तब्बल ५०० हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. या स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ जानेवारीपासून राज्यभरात सुरू होत आहे. ‘नाथे प्रस्तुत’ आणि ‘पृथ्वी एडिफाइस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेला ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’चीही मदत झाली आहे. आता १६ जानेवारी रोजी पुणे आणि अहमदनगर या दोन केंद्रांपासून प्राथमिक फेरी रंगणार आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘लोकसत्ता’ने राज्याच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयांत दडलेल्या तरुण वक्त्यांना व्यासपीठ देण्यासाठी ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून अडीचशेहून अधिक महाविद्यालयांतील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांवर ही स्पर्धा होत आहे.
प्राथमिक फेरीसाठी दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर स्पर्धकांना किमान आठ ते कमाल दहा मिनिटे भाषण करायचे आहे. विषयाचे सादरीकरण, भाषेचे सौंदर्य आणि समृद्धी आणि आशय या निकषांवर परीक्षण होणार आहे. या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या स्पर्धकांना विभागीय अंतिम फेरीत आपले वक्तृत्वगुण सिद्ध करावे लागतील. विभागीय अंतिम फेरीदरम्यान एका महनीय वक्त्याद्वारे मार्गदर्शनही केले जाणार आहे. स्पर्धेचे नियम व अटी https://loksatta.com/vaktrutvaspardha या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.