‘लोकसत्ता पूर्णब्रह्म २०१७’ वार्षिकांकाचे आज प्रकाशन; खाद्यखजिन्याचा सचित्र माहितीकोश खुला

कोकणातील कुठले कुठले खाद्यपदार्थ जिव्हा तृप्त करतात? पश्चिम महाराष्ट्रातील जेवणाचे पान अधिक झणझणीत कशामुळे होते? विदर्भातील मोकळीढाकळी आतिथ्यशील संस्कृती तेथील खाद्यसंस्कृतीतही कशी उतरते? उत्तर महाराष्ट्रातील कुठल्या पदार्थाना खवय्यांची अधिक पसंती असते? मराठवाडय़ात गेल्यानंतर ज्यांचा आस्वाद घ्यायलाच हवा असे खाद्यपदार्थ कुठले?.. महाराष्ट्रातील खाद्यखजिन्याबाबतच्या या अशा प्रश्नांची उकल करणारा सचित्र माहितीकोश आज, मंगळवारी पट्टीच्या खवय्यांसाठी खुला होत आहे. ‘पितांबरी रुचियाना गूळ’ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म २०१७’ या अंकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्वादाची ही अंगतपंगत अस्सल खवय्यांसमोर येणार आहे.

‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा हा चौथा वार्षिकांक आहे. त्यातून राज्यातील वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची रसदार ओळख करून देणाऱ्या पाककृतींची माहिती वाचकांना मिळेल. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात आज, मंगळवारी सायंकाळी ६ वाजता या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात येईल. या वेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि खाद्यविषयक अभ्यासक मोहसिना मुकादम उपस्थित राहणार आहेत. या वार्षिकांकामध्ये शाकाहारी पाककृतींबरोबरच मांसाहारी पाककृतींची चमचमीत मेजवानीही मिळणार आहे. प्रसिद्ध पाककृतीतज्ज्ञ उषा पुरोहित, कल्पना तळपदे, शुभा प्रभू-साटम, अलका फडणीस, दीपा पाटील, रचना पाटील आणि ज्योती चौधरी-मलिक या यंदाच्या अंकातील मानकरी आहेत.

या कार्यक्रमात शेफ विष्णू मनोहर हे कल्पना तळपदे, शुभा प्रभू-साटम, दीपा पाटील आणि ज्योती चौधरी-मलिक यांच्याशी आपल्या खुमासदार शैलीत गप्पा मारतील. तर, ‘व्यापक होत गेलेली महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती’ या विषयावर मोहसिना मुकादम खाद्यसंस्कृतीचा पट उलगडून दाखवतील.