‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चे मंगळवारी प्रकाशन

महाराष्ट्रातील रसरशीत पाककृती म्हणजे मराठी संस्कृतीला समृद्ध करणारा खाद्यखजिनाच. राज्यात मैलोन्गणिक खाद्यसंस्कृती बदलते. या खाद्यसंस्कृतीचा सचित्र माहितीकोश मंगळवारी खवय्यांच्या भेटीस येणार आहे. राज्याच्या वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थाची ओळख करून देणाऱ्या ‘पितांबरी रुचियाना गूळ’ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म २०१७’ या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवार, २५ जुलै रोजी करण्यात येणार आहे. रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार असून, यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि खाद्यविषयक अभ्यासक मोहसिना मुकादम उपस्थित राहणार आहेत.  ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा हा चौथा वार्षिकांक आहे. त्यात राज्यातील विविध भागांच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची रसदार ओळख करून देणाऱ्या पाककृती आहेत. शाकाहारी पाककृतींबरोबरच यंदा मांसाहारी पाककृतींची चमचमीत मेजवानी अंकात मिळणार आहे. यंदाच्या अंकातील मानकरी आहेत, प्रसिद्ध पाककृतीतज्ज्ञ उषा पुरोहित, कल्पना तळपदे, शुभा प्रभू-साटम, अलका फडणीस, दीपा पाटील, रचना पाटील आणि ज्योती चौधरी-मलिक. त्यांच्याशी या कार्यक्रमात खुमासदार शैलीत गप्पा मारतील शेफ विष्णू मनोहर. त्याचप्रमाणे ‘व्यापक होत गेलेली महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती’ या विषयावर मोहसिना मुकादम विचार मांडतील.

या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स, बँकिंग पार्टनर आहेत डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड आणि पॉवर्ड बाय केसरी टूर्स, गुणाजी एंटरप्रायजेस आणि गद्रे प्रीमियम सीफूडस्. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

  • कधी : मंगळवार, २५ जुलै ’ कुठे : रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी, सायंकाळी ६ वाजता