वक्तृत्व कार्यशाळेत सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

वक्तृत्व म्हणजे काय, भाषण करताना वक्त्याने कोणते भान बाळगले पाहिजे तसेच भाषण करताना आवश्यक असलेली समयसूचकता या विषयांसह महाअंतिम फेरीत उतरण्यासाठीचा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठीही ही कार्यशाळा नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील स्पर्धक विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना व्यक्त केले. राज्यभरातील आठ केंद्रांवर झालेल्या विभागीय अंतिम फेरीतून पहिल्या आलेल्या स्पर्धकांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. हे सर्व आठ स्पर्धक गुरुवारी मुंबईत झालेल्या विशेष कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेनंतर सर्व स्पर्धकांनी मनोगत मांडले.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
candidates tournament 2024 marathi news, candidates tournament 2024 chess marathi news
विदित, प्रज्ञानंद, गुकेश… यांच्यातील कोणी विश्वनाथन आनंद बनेल?
indian squad for t20 world cup
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघनिवड एप्रिल अखेरीस?

भीती कमी झाली

शुक्रवारी होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा खूप मोठा फायदा झाला. आत्मविश्वास आणि स्पर्धेसाठी नेमकी तयारी कशी करायची याचे मार्गदर्शन मिळाले. मनातील भीती कमी झाली आणि महाअंतिम फेरीसाठी मी सज्ज झाले. विषय आणि विचार लोकांच्या मनापर्यंत पोहोचविण्यासाठी मी प्रयत्न करेन.

प्रिया तरडे, (मुंबई विभाग) रुपारेल महाविद्यालय

 

छोटय़ा गोष्टींचे महत्त्व

ज्या सामान्य गोष्टींकडे दुर्लक्ष करत आले त्याच गोष्टींकडे कसा भर द्यायचा हे या कार्यशाळेतून समजण्यास मदत झाली. ही स्पर्धा जिंकणे म्हणजे महाराष्ट्रभर नाव होणे असे आहे. त्यामुळे स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने उद्याचे सादरीकरण करण्याचा माझा प्रयत्न असेल.

आकांक्षा चिंचोलकर, (औरंगाबाद विभाग) देवगिरी महाविद्यालय

 

खऱ्या अर्थाने घडलो!

‘शोध श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या वक्त्याचा’ हे स्पर्धेचे ब्रीदवाक्यच माझ्यासाठी सर्वेसर्वा आहे. भाषेपेक्षा विचारांना महत्त्व आहे हे इथे येऊन कळले. उद्याचा निकाल काही लागला तरी या कार्यशाळेतून मी खऱ्या अर्थाने घडलो असे मला वाटते.

आदित्य वडवणीकर, (अहमदनगर विभाग) रावबहाद्दूर नारायणराव बोरावके महाविद्यालय

 

निर्भीड मतमांडणीसाठी उपयोगी

फक्त वक्तृत्व स्पर्धेसाठी म्हणून नाही तर पुढील आयुष्यासाठी शिदोरी म्हणून उपयोगी पडेल, अशी आजची कार्यशाळा होती. ज्या एका विषयावर समाज भाष्य करतो अशा विषयांवर उद्या आम्ही आमचे मत मांडणार आहोत आणि हे मत निर्भीडपणे कसे मांडायचे याची आज सुरुवात झाली. उद्याचे वक्तृत्व चौकटीबाहेर जाऊन मांडण्याचा मी प्रयत्न करेन.

मैत्रेयी बांदेकर, (रत्नागिरी विभाग) गोगटे-जोगळेकर महाविद्यालय

 

चौकटीबाहेरची कार्यशाळा

ही साचेबद्ध अशी ‘कार्यशाळा’ नव्हती, तर व्यक्तिगत आणि आपलेपणाने साधलेला संवाद होता. आमच्या अडचणी समजून घेतल्या आणि न्यूनगंडावर कशी मात करायची हे शिकायला मिळाले. निरीक्षण आणि अनुभवाच्या माध्यमातून उद्याची स्पर्धा जिंकायची तयारी सुरू आहे.

श्वेता भामरे (नाशिक विभाग) के.टी.एच.एम. महाविद्यालय

 

वैचारिक लाभ झाला!

या कार्यशाळेतून वक्तृत्वाची बाराखडी समजण्यास मदत झाली. वक्ता कसा असावा यापेक्षा नेतृत्व करणारा वक्ता कसा असावा हे लक्षात आले. उद्याचा निकाल काहीही लागला तरी हरकत नाही. कार्यशाळेच्या माध्यमातून वैचारिक लाभ मिळाला ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. उद्याच्या महाअंतिम फेरीसाठी सगळ्यांचे पाठबळ आहे.

शंतनू रिठे (पुणे विभाग) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

 

लोकसत्ताखुले व्यासपीठ

वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांसाठी अशा प्रकारची कार्यशाळा घेणे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इतक्या मोठय़ा स्पर्धेत सहभागी होणे हे स्वप्न ‘लोकसत्ता वक्तृत्व’ स्पर्धेच्या निमित्ताने सत्यात उतरले आहे. कोणत्याही बंधनाशिवाय बोलण्याचे व्यासपीठ फक्त ‘लोकसत्ता’च देऊ शकते.

मंथन बिजवे (नागपूर विभाग) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

 

गैरसमज दूर

वक्तृत्वाविषयीचे सर्व समज आणि गैरसमज दूर झाले. महाअंतिम फेरी जिंकणे हे खूप अवघड आहे. आत्तापर्यंत आपण जे केले त्याची प्रचीती उद्या येईल. थोडक्यात ‘पेरले ते उगवेल’ असे मी म्हणेन. विचार आणि ज्ञानाच्या बळावर मी महाअंतिम फेरीसाठी प्रयत्न करत आहे.

प्रज्ञा पोवळे (ठाणे विभाग) जोशी-बेडेकर महाविद्यालय

 

चांगला वक्ता होण्यासाठी मार्गदर्शकांच्या टिप्स

रश्मी वारंग

  • आवाजाचा सुयोग्य वापर करून तुमचे भाषण प्रभावी कसे होईल याकडे लक्ष द्या.
  • भाषण करताना वाक्यातील क्रियापदे कधी गाळू नका. वाक्याच्या पूर्णविरामापर्यंतचे शब्द योग्यप्रकारे उच्चारा.
  • भाषणाला उभे राहिल्यानंतर ध्वनिक्षेपकाशी स्वत:ला जुळवून घ्या. ध्वनिक्षेपकापासून आपले तोंड लांब जाणार नाही याची बोलताना काळजी घ्या, नाही तर भाषणातील काही वाक्ये किंवा शब्द श्रोत्यांपर्यंत पोहोचणार नाहीत.
  • बोलण्याच्या ओघात आवंढा किंवा तोंडात जमा होणारी लाळ नेमकी कधी व कशी गिळायची तिकडेही लक्ष द्या.
  • कधी कधी अचानक बोलताना पुढे काय बोलायचे ते विसरायला होते आणि आपण गोंधळून जातो. भाषणातील पुढील मुद्दा कोणता असणार आहे, ते मनाशी अगोदर ठरवून ठेवा.
  • भाषण करताना नजर सर्वत्र फिरवीत बोला.
  • दररोज किमान एका मराठी आणि एका इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन करा. कमीत कमी इंग्रजी शब्दांचा वापर आणि उत्तम मराठी ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखात असते. आवाजाचा व्यायाम व सरावासाठी या वृत्तपत्राचा ‘अग्रलेख’ दररोज वाचा.
  • बोलताना आपला आवाज कर्णकर्कश होणार नाही याची खबरदारी बाळगा. स्वत:चा आवाज ध्वनिमुद्रित करून ऐका आणि झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा.

संपदा जोगळेकर-कुलकर्णी

प्रभावी आणि उत्तम भाषण होण्यासाठी तुमच्याकडे शब्दसंपत्ती मोठय़ा प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्याकरिता वाचन हे आवश्यक आहे. त्याचबरोबर हे शब्द आणि भाषा आपलीशी करा.

तुमच्या भाषेची शैली वेगळी असेल तर त्याबद्दल कमीपणा मानून घेऊ नका. इतरांपेक्षा ती वेगळी असल्यामुळे तुमच्यासाठी ती संधी आहे असे समजा. तुमच्या स्वत:च्या शैलीत आणि पट्टीतच बोला. कोणाचे अनुकरण करू नका.

भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी दीर्घ श्वसन करा. यातून तुम्हाला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळेल आणि त्यामुळे मनावर आलेले दडपण व ताण नाहीसा होण्यास नक्कीच मदत होईल.

तुम्ही मांडणारा विषय गंभीर, वैचारिक, विनोदी आहे यावर काहीही अवलंबून नसते, तर तुमच्या भाषणातून तुम्ही जो विचार आणि जो आशय व्यक्त करता तो सर्वात महत्त्वाचा असतो.

भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट चांगला आणि परिणामकारक कसा होईल याकडेही लक्ष द्या. तुम्ही सादर करणार असलेल्या विषयाच्या अनुषंगाने महत्त्वाचे असे आठ ते दहा मुद्दे मनाशी नोंद करून ठेवा किंवा एखाद्या छोटय़ा कागदावर त्याचे टिपण तयार करा.

भाषणात फापटपसारा न आणता मुद्देसूद आणि विषयाला धरून बोला.  तुमच्या बोलण्यातून तळमळ दिसली पाहिजे.

गिरीश कुबेर

  • भाषण करताना आपण जे विचार किंवा मत मांडणार आहोत ते खणखणीतपणे व्यक्त करा.
  • भाषण सुरू केल्यानंतर काही वेळात श्रोत्यांना आपलेसे करून घेणे गरजेचे असते. ते जेवढय़ा कमीत कमी वेळेत करून घेता येईल तेवढे जास्त चांगले. हा क्षण आपल्याबाबतीत नेमका कधी येऊ शकतो ते तपासून पाहा.
  • स्पर्धेत आपले सादरीकरण करताना स्वत:विषयी पूर्णपणे आत्मविश्वास बाळगा.
  • विषय मांडताना आपले भाषण इतरांपेक्षा वेगळे कसे ठरेल, वेगळे विचार त्यात कसे येतील त्याकडेही लक्ष द्या.
  • विषय कोणताही असला तरी त्यावर आपल्याला बोलता आले पाहिजे. त्यासाठी अभ्यास आणि आपल्या मनाचीही तयारी असली पाहिजे.
  • ‘कुतूहल असणे’ हे आपल्या प्रगतीचे पहिले पाऊल आहे असे समजा.