‘लोकसत्ता’च्या ६९व्या वर्धापनदिनानिमित्त ‘वर्षवेध’ वार्षिकाचे फडणवीस यांच्या हस्ते आज प्रकाशन

समाजातील उण्या बाजूंवर बोट ठेवणाऱ्या, अधिक बाजूंवर प्रकाश टाकणाऱ्या,  निष्पक्षपणे वृत्तांकन करणाऱ्या, ‘जाणत्या’ वाचकांसाठी बातमीपल्याडची बातमी शोधणाऱ्या, वाचकांमधील विश्वासार्हतेचा मापदंड निर्माण करणाऱ्या‘लोकसत्ता’च्या ६९व्या वर्धापन दिनानिमित्त आज, मंगळवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर निमंत्रितांसाठीच असलेल्या या कार्यक्रमात २०१६मध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता वर्षवेध’ या वार्षिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल.  त्यानंतर विविध क्षेत्रांमधील दहा निवडक मान्यवर, तज्ज्ञ हे मुख्यमंत्र्यांना  प्रश्न विचारणार असून मुख्यमंत्री त्या प्रश्नांची थेट उत्तरे देणार आहेत. निर्भिड आणि निष्पक्ष पत्रकारिता ही दोन मूल्ये जपत वाचकांसाठी सकस मजकूर ‘लोकसत्ता’ सातत्याने देत आला आहे. मराठी पत्रकारितेचे वैशिष्टय़ असलेली अग्रलेख संस्कृती जपणारे एकमेव वृत्तपत्र, अशीही ‘लोकसत्ता’ची ओळख वाचक देतात. त्याशिवाय समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही घेऊन येणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’, ‘लोकरंग’, ‘व्हिवा’ या पुरवण्याही त्यातील आशयघन मजकुरामुळे वाचकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. वर्षवेध या वार्षिकामुळे‘लोकसत्ता’ आणि वाचक यांच्यातील नाते आणखी वृद्धिंगत होत आहे.

विचारकार्यक्रम!

वर्धापन दिनाच्या निमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून ‘लोकसत्ता’  सरलेल्या वर्षांतील घडामोडींचा वेध घेणारे ‘वर्षवेध’ या वार्षिकाचे प्रकाशन करते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाच्या ठरलेल्या या ‘वर्षवेध’चे प्रकाशन यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पर्यावरण, राजकारण,  समाजकारण, कला आदी क्षेत्रांमधील मान्यवर  मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतील. प्रश्नकर्त्यांमध्ये वाय. एम. देवस्थळी, माधव गाडगीळ, डॉ. अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मेधा पाटकर, अजित रानडे, प्रदीप आपटे, प्रसाद पुरंदरे आणि अतुल कुलकर्णी या मान्यवरांचा समावेश आहे. या मान्यवरांची प्रश्नपत्रिका व मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यावरील उत्तरपत्रिका अशा अनोख्या मुलाखतीचा कार्यक्रम विविध क्षेत्रांमधील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगेल.