व्हिवा लाउंजमध्ये बुधवारी वैशाली शडांगुळे
काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न उराशी घेऊन वयाच्या अठराव्या वर्षी ‘ती’ घराबाहेर पडते, शहरात येते, कोणतीही पाश्र्वभूमी नसताना फॅशनविश्वातील चकाकत्या दुनियेचा एक भाग होते. स्वतच्या नावाचा ब्रॅण्ड निर्माण करते आणि त्याची ओळख देश-विदेशात पसरवते.. मध्य प्रदेशातील विदिशामध्ये वाढलेल्या एका मराठमोळ्या मुलीचा हा ध्येयवेडा विलक्षण प्रवास बुधवारी होणाऱ्या ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मध्ये उलगडणार आहे. ही मुलगी म्हणजे आघाडीच्या फॅशन डिझायनर वैशाली शडांगुळे. वैशाली एस. हा ब्रॅण्ड देशातील प्रमुख फॅशन शोमधील एक महत्त्वाचे नाव झाला आहे. भारतीय परंपरेतील वस्त्रांना आधुनिक शैलीतील कलात्मक रूप देणारी डिझायनर म्हणून वैशाली यांची वैशिष्टय़पूर्ण ओळख फॅशनविश्वात निर्माण झाली आहे.
फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नेमक्या कुठल्या कौशल्यांची आवश्यकता असते, या क्षेत्रात करिअर करायच्या किती संधी आहेत हे वैशाली यांच्या मुलाखतीमधून उलगडेल. या कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांनाही वैशाली यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. भारतीय पारंपरिक वस्त्रोद्योगाच्या कलात्मकतेशी नाते सांगतानाच वैशाली एस. हा ब्रॅण्ड जागतिक फॅशनमधल्या आधुनिकतेला आपलेसे करतो. वैशाली यांनी डिझाइन केलेले कपडे सोनम कपूर, विद्या बालनसारख्या लोकप्रिय अभिनेत्री हौसेने मिरवतात. फॅशनच्या झगमगत्या रॅम्पवर अस्सल देशी, पारंपरिक ओळख सांगणाऱ्या ‘चंदेरी’ आणि ‘पैठणी’ला वैशाली यांनी ग्लॅमर मिळवून दिले. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करणाऱ्या हातमाग कारागिरांची कला वैशाली यांना भावली आणि कारागिरांच्या याच कलेला आधुनिकतेची जोड देत त्यातून अस्सल भारतीय तरीही जागतिक अपील असलेली डिझाइन्स वैशाली यांनी दिली.
फॅशन डिझायनिंगमधील वैशाली यांचा वेगळा दृष्टिकोन त्या बुधवारच्या कार्यक्रमातून स्पष्ट करतील. ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.