कोणत्याही लोकप्रिय भूमिकेच्या साच्यात न अडकता प्रेक्षकांच्या ‘ध्यानीमनी’ वसणारी नायिका, एक संवेदनशील कलाकार, लेखिका आणि कलासक्त निर्माती म्हणूनही ओळख असणारी अभिनेत्री अश्विनी भावे शुक्रवारी केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या व्यासपीठावरून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी गाजवून हिंदी चित्रपटसृष्टीत गेलेल्या आणि तेथेही सशक्त अभिनयामुळे गाजलेल्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये अश्विनी भावे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.

अशा हरहुन्नरी संवेदनशील अभिनेत्रीबरोबर दिलखुलास गप्पांचा हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. ‘वजीर’, ‘कदाचित’, ‘कळत नकळत’, ‘सरकारनामा’ अशा चित्रपटांतून अश्विनी भावे यांच्यातील संवेदनशील अभिनेत्री दिसली. त्याच वेळी ‘अशी ही बनवाबनवी’सारख्या विनोदपटांमधील त्यांच्या भूमिकाही लक्षात राहणाऱ्या ठरल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणातच त्यांना आर. के. बॅनरचा ‘हीना’सारखा चित्रपट करायला मिळाला. रंगभूमी आणि टीव्ही मालिकांमधूनही अश्विनी भावे यांना काही दमदार भूमिका करायला मिळाल्या. कुटुंबासमवेत अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करताना त्यांनी ‘कदाचित’सारखा वेगळा चित्रपट दिला. अभिनयाबरोबर निर्माती म्हणूनही त्यांनी वेगळी वाट चोखाळली. त्यानंतर आलेल्या ‘आजचा दिवस माझा’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ध्यानीमनी’मधील अश्विनी भावे यांचा सशक्त अभिनय वाखाणला जातोय. अमेरिकेत चित्रपटनिर्मितीविषयी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी तेथेही काम केले आहे.

  • कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
  • कधी – शुक्रवार, २४ फेब्रुवारी
  • वेळ – सायंकाळी ५ वाजता.