‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मध्ये अश्विनी भावे यांची छोटय़ा पडद्यावरील कंटाळवाण्या मालिकांवर टीका

काही अपवाद वगळता भारतीय दूरचित्रवाणी माध्यमात सध्या उथळ, सपक आणि खूप कंटाळवाणे कार्यक्रम सादर केले जातात, अशी टीका सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांनी ‘केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत केली.

मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मराठमोळी मुलगी, आधी मराठी, मग हिंदी सिनेमातील नायिका, लग्नानंतर अमेरिकेतील वास्तव्य, संसार, मुलांचे संगोपन हा जीवनप्रवास प्रांजळपणे मांडताना भावे यांनी या वेळी येथील छोटय़ा पडद्यावरच्या मालिकांची वास्तव स्थिती विशद केली. अमेरिकेत सिनेमांबरोबरच विविध विषयांवरचे अतिशय चांगले लघुपट तयार केले जातात. तेथील सिनेकर्ते संहिता, आशय आणि संवादलेखनावर खूप मेहनत घेतात. भारतात मात्र दुर्दैवाने लघुपटांना फारसे महत्त्व दिले जात नाही. काही अपवाद सोडल्यास इथल्या मालिका कंटाळवाण्या आणि उथळ आहेत.  त्या तुलनेत ‘वेबसीरिज’ंमध्ये खूप चांगले प्रयोग होताना दिसतात. त्यामुळे भविष्यात या नव्या माध्यमात काम करायला आवडेल. संधी मिळाली तर चित्रपट दिग्दर्शित करायचाही विचार आहे, असेही अश्विनी भावे यांनी गप्पांच्या ओघात सांगितले. तब्बल दीड तास रंगलेल्या या मुलाखतीत त्यांनी कारकीर्दीतील चढउतार, कटुगोड आठवणी मोकळेपणे मांडल्या.

मला सूक्ष्मजीवशास्त्रात उच्च शिक्षण घ्यायचे होते. मात्र क्षमता चाचणीतील निष्कर्षांनुसार मी कलाशाखा निवडली. नाटकाच्या प्रयोगामुळे एम.ए.चा शेवटचा पेपर देता आला नाही. पुढे मात्र मी अभिनय क्षेत्रावरच लक्ष केंद्रित केले. अमेरिकेत गेल्यावर संसार आणि मुलांचे संगोपन या गोष्टींना मी प्राधान्य दिले. मात्र ते करीत असताना मी तिथे अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतले. त्यानिमित्ताने जागतिक सिनेमा पाहण्याची संधी मिळाली. तिथे मी एक लघुपट केला. त्यामुळे एकूणच दृक् -श्राव्य माध्यमाबाबत माझ्या जाणिवा समृद्ध झाल्या, असे त्यांनी सांगितले.

कारकीर्दीविषयी..

किशोरवयातच ‘चंद्रलेखा’च्या ‘गगनभेदी’ या व्यावसायिक नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असले तरी या क्षेत्रात करिअर करण्याचा माझा विचार नव्हता. मात्र पुढे योगायोगाने भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ‘शाब्बास सूनबाई’ने सुरू झालेल्या कारकीर्दीचा ‘हिना’ हा कळस होता. राज कपूरसारख्या हिंदीतील शोमॅनच्या सिनेमातील भूमिका माझ्या कारकीर्दीला आमूलाग्र बदलवणारी ठरली. खरे तर ‘हिना’मध्ये माझी भूमिका दुय्यम होती. मात्र तरीही या भूमिकेचे जगभर कौतुक झाले. सध्या मराठी सिनेमांमध्येही उत्तम अभिनय क्षमता असलेल्या अनेक नायिका आहेत. त्यांनाही माझ्यासारखीच ‘हिंदी’मध्ये मोठी आणि चांगली संधी मिळावी, अशी सदिच्छा अभिनेत्री अश्विनी भावे यांनी व्यक्त केली.