एटीव्हीएमवरून तिकीट काढणाऱ्यांच्या संख्येत ४० टक्क्यांची वाढ
तिकीट खिडक्यांपुढील रांगा कमी करण्यासाठी प्रवाशांना विविध पर्याय देण्याचा रेल्वेचा हेतू सफल झाला असून यापकी एटीव्हीएमच्या पर्यायाला प्रवाशांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. २०१४च्या तुलनेत २०१५मध्ये एटीव्हीएमचा वापर करून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या ४०.९८ टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी तिकीट खिडक्यांवरून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या ५.८८ टक्क्यांनी घटली आहे. एटीव्हीएमकडे वळणाऱ्या प्रवाशांमध्ये सीव्हीएम कूपन्सचा वापर करणाऱ्या आणि ती बंद झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.
एटीव्हीएमचा वापर तिकिटांसाठी वाढत असला, तरी स्मार्टकार्डची विक्री मात्र तेवढय़ा प्रमाणात वाढलेली नाही. प्रवासी अजूनही एटीव्हीएमच्या बाजूला उभ्या असलेल्या मदतनीसांच्या स्मार्टकार्डवरून तिकीट काढणेच पसंत करतात. त्यामुळे हे मदतनीस असलेल्या स्थानकातील एक किंवा दोन एटीव्हीएम यंत्रांसमोर रांग लागलेली दिसते. उर्वरित एटीव्हीएम यंत्रांवर कोणीच प्रवासी फिरकत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रवाशांनी स्मार्टकार्ड घेऊन स्वत: तिकीट खरेदी करावे. त्यामुळे त्यांना त्वरित तिकीट मिळेल, असे आवाहन रेल्वेने केले आहे.