पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी टक्केवारीची अट काढून टाकण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. जे विद्यार्थी बारावी आणि पदवी परीक्षेत फक्त उत्तीर्ण असतील असे सर्व विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी पात्र ठरतील, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.
या आधी मुंबई विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गासाठी किमान ४० टक्के आणि खुल्या प्रवर्गासाठी किमान ४५ टक्के गुणांची अट होती. आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी समाजातील सर्वच घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्याला ३१ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या विद्वत परिषदेने मान्यता दिली. मुंबई विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर अनेक पारंपरिक आणि स्वयं अर्थसहाय्यित अभ्यासक्रम चालविले जातात. यातील काहींसाठी गुणांची टक्केवारी निश्चित केली आहे. या निर्णयामुळे जे विद्यार्थी बारावी परीक्षेत आणि पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेले असतील असे सर्व विद्यार्थी प्रवेशास पात्र समजले जाणार आहेत.

प्रत्येकाला उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी टक्केवारीची ही अट काढून टाकण्यात आली आहे. असा निर्णय घेणारे मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिले विद्यापीठ ठरणार आहे.
डॉ. संजय देशमुख, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ