आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा पराक्रम; तब्बल ७४२४ किलोमीटरचा प्रवास

तब्बल ७४२४ किलोमीटरचा प्रवास सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सायकलवरून केल्याची नोंद गिनिज बुकमध्ये नुकतीच करण्यात आली. ‘द सन पेडल राईड’ या प्रकल्पाअंतर्गत मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा (आयआयटी) माजी विद्यार्थी सुशील रेड्डीने सौरऊर्जेवर चालणाऱ्या सायकलवरून हा पराक्रम केला आहे. ८ मे ते २५ जुलै या ७९ दिवसांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेश या नऊ राज्यांमधून सौर ऊर्जेबाबत जागृती करत त्याने हा प्रवास केला. या प्रकल्पासाठी सुशीलने तामिळनाडूतील हुलीक्कल इंडिया या ई-बाइक कंपनीकडून खास सौर ऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल तयार करून घेतली होती. २१ गिअरच्या या सायकलला दोनचाकी ट्रेलर जोडण्यात आलेला आहे. त्याला १५ हजार रुपये किमतीचे, तीन किलो वजनाचे आणि २५ वर्षे वॉरंटी असलेले २४० वॉटचे सौरऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहेत. दिवसाला १.२ युनिट याप्रमाणे साठ दिवसांच्या सायकल प्रवासातून ७८ युनिट वीजही यातून तयार करून ती सायकल चालवण्यासाठी वापरण्यात आली.

सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी केलेल्या या सायकल प्रवासामध्ये सुशिलने शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थामधील एकूण दहा हजार लोकांशी संवाद साधला. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी भारतातील प्रशिक्षित लोकांचा आकडा हा नगण्य असून भविष्यात या क्षेत्रात मोठय़ा रोजगार संधी आहे. सुशिलने चर्चासत्रांच्या माध्यमातून सौर ऊर्जा क्षेत्रात भारतात काय काम सुरू आहे, त्याचा वापर कसा करायचा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले त्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले.

सुशिलच्या आधी प्रसाद नानासाहेब इरांडे यांनी देशात साध्या सायकलवरून १४ हजार किलोमीटरचा प्रवास केल्याची नोंद गिनिज बुकात आहे. परंतु, कुठल्याही ऊर्जेवर चालणा-या सायकलवर इतक्या लांबचा प्रवास करणारा सुशिल रेड्डी हा पहिला भारतीय ठरला आहे.

सुशिलला या प्रवासात आयआयटीचा विद्यार्थी राजेंद्र भास्कर, तांत्रिक साहाय्यतेसाठी हिमांशू सिंग आणि अक्षय ऊर्जेमध्ये ऑस्ट्रेलियातील विद्यापीठातून पदवीधर असलेला कृणाल टेलर यांनी मोलाची मदत केली.