राहुल मुखर्जी आणि शीना बोरा एकमेकाचे सावत्र भाऊ-बहिण असले तरी त्यांचे प्रेमसंबंध होते. ते लग्नही करणार होते. शीना एकाएकी बेपत्ता झाल्याने राहुल अस्वस्थ झाला होता. बैचेन झालेल्या राहुलने तिला शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु ती सापडली नाही. म्हणूनच त्याने हे प्रकरण तीन वर्षांनंतर प्रकरण पोलिसांपर्यंत नेल्याची चर्चा आहे.
राहुल आणि शीना मुंबईच्या अंधेरी भागात भाडय़ाने राहत होते. शीनाच्या हत्येपूर्वी राहुल आपल्या वडिलांकडे राहत होता. शीनाची २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या झाली. ही हत्या लपविण्यासाठी इंद्राणी मुखर्जी हिने ती अमेरिकेत गेल्याचा बनाव केला. आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी शीना अचानक काहीही न सांगता अमेरिकेत कशी काय जाऊ शकते, असा प्रश्न त्याला पडला.
शीनाचे पारपत्रही राहुलकडे होते. पण ती दुसऱ्या पारपत्राद्वारे देश सोडून गेल्याचे इंद्राणीने त्याला सांगितले होते. मला संपर्क करू नकोस, आपले संबंध संपले अशा आशयाचा एसएमएसही इंद्राणीने शीनाच्या मोबाईलवरून राहुलला पाठवला होता. तेव्हापासून राहुलचा संशय बळावला होता आणि तो शीनाचा शोध घेत होता. त्याने शीनाच्या सर्व मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. खार आणि वरळी पोलिसांकडेही ती बेपत्ता असल्याबाबत तोंडी तक्रार दिली होती. शीना बेपत्ता होण्यामागे काही तरी काळेबेरे असे वाटून त्याने ही बाब त्याने मुंबईच्या पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवली.