नवऱ्यापासून वेगळ्या राहणाऱ्या महिलेच्या प्रियकराने तिच्या आठ वर्षांच्या मुलीला केलेल्या मारहाणीत त्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. या घटनेबाबत मानखुर्द पोलीस ठाण्यात ही महिलाआणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या प्रियकराचा शोध चालू आहे.
मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाउंड येथे उषा भोळे ही महिला आपल्या तीन मुलांसह राहते. वर्षभरापूर्वी उषाचा पती तिच्यापासून वेगळा झाल्यानंतर अविनाश फुलपगारे हा तरुण  तिच्यासह राहू लागला. अविनाश उषाच्या मुलांना शुल्लक कारणांवरून मारहाण करत असे आणि उषा त्याकडे दुर्लक्ष करत असे. रविवारी दुपारी अविनाश मद्याच्या अमलाखाली घरी आला आणि त्याने उषाच्या आठ वर्षांच्या तनिषाला  बाहेर जाण्यास सांगितले. तनिषाने नकार देताच संताप अनावर होऊन त्याने तिला मारहाण करून तिचे डोके भिंतीवर आपटले. घाव वर्मी बसल्याने तनिषा बेशुद्ध पडली. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्याआधीच ती मृत्युमुखी पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र उषाकडे चौकशी केली असता तिने आपली मुलगी खेळताना पडली आणि तिच्या डोक्याला मार लागल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही अपमृत्युची नोंद केली.
मात्र, मुलीच्या मृत्युची बातमी कळताच तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत अविनाशने मुलीची हत्या केल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनाच्या अहवालात तनिषाला डोक्याच्या आतून जखम झाल्याने आतल्या आत रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी उषाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्या वेळी तिने आपल्या प्रियकराने केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. मानखुर्द पोलिसांनी अविनाश फुलपगारे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून गुन्हेगाराला सहकार्य केल्याबद्दल उषाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.