मुंबईकरच नव्हे तर बाहेरून मुंबईत येणाऱ्यांसाठीही ‘वाटाडय़ा’चे काम करणारे ‘एम इंडिकेटर’ हे अ‍ॅप अद्ययावत झाले आहे. लोकल, बेस्ट यांच्या जोडीने आता नव्याने सुरू झालेल्या मोनो, मेट्रो तसेच काही फेरी बोटींचे वेळापत्रक आणि तिकीट दरही आता त्यावर पाहता येणार आहेत.
मुंबईतील सचिन टेके या तरूणाने विकसित केलेल्या ‘एम इंडिकेटर’च्या नव्या व्हर्जनचे शुक्रवारी त्याच्याच हस्ते अनावरण करण्यात आले. अ‍ॅपमध्ये मोनो आणि मेट्रो या दोन नव्या वाहतूक सेवांचे वेळापत्रक आणि दरपत्रक मिळणार आहे. याशिवाय या दोन्ही सेवांचे नियमही त्यात असणार आहेत. मेट्रोतून प्रवास करत असताना काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधाही या अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे. ही तक्रार थेट मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे पोहोचणार आहे. त्यासंदर्भात मेट्रो यंत्रणेशी समन्वय झाल्याचे सचिनने सांगितले.
पावसाचे अपडेट्सही मिळवा
सचिनने मुंबई महापालिकेच्या सहकार्याने या अ‍ॅपमध्ये पावसाचे अपडेट्स देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. मुंबईत किती पाऊस पडला, भरती-ओहोटीच्या वेळा आदी माहितीही मिळणार आहे.