चित्रपट, नाटक, मालिका, साहित्य या सर्व माध्यमांमध्ये लेखक-अभिनेत्री म्हणून लीलया वावरणारी तरुण पिढीतील आश्वासक कलाकार मधुगंधा कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवादाचा कार्यक्रम व्हिवा लाउंजच्या निमित्ताने येत्या बुधवारी, ६ मे रोजी मुंबईत होणार आहे. मधुगंधाने लिहिलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ mu08चित्रपटाला या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही मधुगंधाने पेलली होती.
‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेची पटकथा मधुगंधाची आहे, तर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या आणखी एका लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री म्हणून त्या प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘लाली लीला’सारख्या नाटकामधून सशक्त अभिनेत्री म्हणून त्यांनी पूर्वीच लक्ष वेधून घेतले होते. लहान वयातच मधुगंधा यांनी लिहायला सुरुवात केली. कादंबरी, कथा लिखाणाबरोबर नाटककार म्हणूनही त्या पुढे आल्या. ‘लग्नबंबाळ’सारखे व्यावसायिक रंगभूमीवर गाजत असलेले नाटक त्यांचे आहे. सर्वसामान्य प्रेक्षक आणि जगभरातील समीक्षक यांनी मधुगंधाच्या लेखनाला सारखीच पसंती दिली आहे, हे ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातून सिद्ध झाले आहे. या लोकप्रिय तरुण लेखिका-अभिनेत्रीशी संवाद साधण्याची संधी येत्या बुधवारी केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंजधून मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
ल्ल कधी – बुधवार, दिनांक ६ मे  ल्ल कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्कसमोर, दादर (प) ल्ल वेळ – सायं. ६ वाजता.