प्राध्यापकांचे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे

गेले सात महिने कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथील ‘जे.जे.मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालया’तील प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना संस्थाचालकांनी वेतनच दिले नसल्यामुळे हताश प्राध्यापकांनी वेतनासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी संस्थाचालकांची असेल, असे येथील प्राध्यापकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

यापूर्वी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाला सुमारे ३५ पत्रे पाठवूनही कोणतीही कारवाई झाली नाही. उलट उच्च व तंत्रशिक्षण विभागातील उपसचिवाने ‘वेतन मिळत नाही तर सरकार काय करणार, आम्ही कारवाई करू शकत नाही,’ असे सांगून या अध्यापकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले.

गंभीर गोष्ट म्हणजे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांनी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालकांना अनेक वेळा पत्र पाठविल्यानंतर विभागाच्या पुणे येथील सहसंचालक डॉ.दि.रा.नंदनवार यांनी सखोल चौकशी करून येथील कारभाराचा पंचनामा करीत अध्यापकांना व कर्मचाऱ्यांना जुलै, २०१५ पासून वेतनच मिळत नसल्याचे आपल्या अहवालात नमूद केले.  या प्रकरणी महाविद्यालयावर कडक कारवाई करण्याची शिफारसही डिसेंबर, २०१५ रोजी आपल्या अहवालात केली. मात्र आजपर्यंत तंत्रशिक्षण संचालनालयाने कोणतीही कारवाई केलेली नाही. ‘‘सिटिझन फोरम फॉर सँटिटी इन एज्युकेशन सिस्टीम’ या संस्थेने याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर उद्या गुरुवारी मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थाचालक व अध्यापकांची बैठक बोलाविण्यात आली आहे.

एकीकडे संचालनालय हे नियमित वेतन करा, असे पत्रक काढते. मात्र पगार न देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करीत नाही.

दुसरीकडे मंत्रालयात बसलेले तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव किरण पाटील हे सरकार काहीही करू शकत नाही, असे उद्दामपणे सांगतात. मग अध्यापक व कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी दाद मागायची कोणाकडे, असा सवाल फोरमने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.

कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच, उपसचिव किरण पाटील यांचे संस्थाचालकांबरोबर लागेबांधे आहेत का, याची चौकशी करावी, अशी मागणी प्राध्यापक वैभव नरवडे व प्राध्यापक सदानंद शेळगावकर यांनी केली आहे.

  • सरकार काय करणार-उपसचिवाचा मुजोर सवाल
  • जिवाचे बरेवाईट झाल्यास संस्थाचालक जबाबदार-प्राध्यापक
  • कडक कारवाई करण्याची सहसंचालकांची शिफारस
  • आज मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थाचालक व अध्यापकांची बैठक
  • संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्राध्यापकांची मागणी