मान्यवरांशी संवादासह मराठी-इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मॅजेस्टिक बुक डेपो’च्या वतीने आणि ‘लोकमान्य सेवा संघा’च्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या सहकार्याने विलेपार्ले (पूर्व) येथे २८ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती आणि वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवादांनी ‘मॅजेस्टिक गप्पा’ रंगणार आहेत. सायंकाळी ७.४० वाजता ‘मॅजेस्टिक गप्पा’ सुरू होतील. तसेच सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत इंग्रजी आणि मराठी पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध लेखिका नीरजा यांच्या प्रकट मुलाखतीने २८ डिसेंबर रोजी ‘मॅजेस्टिक गप्पां’ना सुरुवात होणार आहे. प्रा. पुष्पा भावे आणि प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर त्यांची मुलाखत घेणार आहेत. लेखिका नीरजा यांच्या मुलाखतीबरोबरच अ‍ॅड किंग आणि दिग्दर्शक अभिनव देव, कलादिग्दर्शक नितीन देसाई, संगीत दिग्दर्शक आनंदजी, अभिनेते सयाजी सिंदे यांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वामी ‘विवेकानंद : २१ वे शतक, विज्ञा आणि अध्यात्म’, ‘वाढते आयुर्मान : समाधान की चिंता’, ‘रमाबाई आणि माधवराव रानडे : वास्तवातले आणि मालिकेतले’, ‘जगणं देवदासींचं’, ‘साहित्यकृती आणि सिनेमा’ या विषयांवर परिसंवादांचेही आयोजन करण्यात
आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये स्वामी अवधूतानंद, जयंत सहस्रबुद्धे, अभय बापट, डॉ. मोहन देसाई, डॉ. संतोष सलागरे, डॉ. देवदत्त भडळीकर, डॉ. जान्हवी केदारे, श्रीकांत परांजपे, डॉ. संजय ओक, डॉ. विलास खोले, वीरेंद्र प्रधान, स्पृहा जोशी, अरुणा जोगळेकर, अरुण म्हात्रे, प्रा. विठ्ठल बन्न्ो, सुशीला नाईक (देवदासी, निपाणी), पुष्पा उपळेकर (देवदासी, कोल्हापूर), बळीराम कांबळे (जोगता, कोल्हापूर), सुरेश चव्हाण, अजितेम जोशी, नीला रवींद्र, रमेश इंगळे-उत्रादकर, राजीव पाटील, सुजय जहाके, गणेश मतकरी, स्मिता तळवलकर, रवीराज गंधे, अमित भंडारी, शोभा बोंद्रे, मंदार जोशी आदी सहभागी होणार आहेत.
‘मॅजेस्टिक गप्पां’बरोबरच हजारो मराठी आणि इंग्रजी ग्रंथांचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनात १० ते ३० टक्के सवलतीत ग्रंथ उपलब्ध होतील. त्याशिवाय साहित्य अकादमी पारितोषिकप्राप्त पुस्तके, लक्षवेधी पुस्तके, केशवराव कोठावळे पारितोषिकप्राप्त पुस्तके, जयवंत दळवी पुरस्कारप्राप्त पुस्तके यांचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत. २८ डिसेंबर ते ६ जानेवारी या काळात सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे ग्रंथप्रदर्शन सर्वासाठी खुले राहील.