राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेस पक्षात विलीन व्हावे, असा सल्ला देणाऱया वनमंत्री पतंगराव कदम यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी जोरदार हल्ला चढविला. शरद पवार यांना सल्ला देण्याइतके पतंगराव कदम ज्येष्ठ नाहीत. यापेक्षा त्यांनी कॉंग्रेस पक्ष अधिक बळकट कसा होईल याकडे लक्ष द्यावे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले.
पतंगराव कदम यांच्याकडे चांगली विनोदशैली आहे. मात्र, त्यांच्याच पक्षात त्यांना कोणी गांभीर्याने घेते, असे मला वाटत नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांचे मजबूत सरकार कसे येईल, याकडे लक्ष द्यावे, असे ट्विट सुनील तटकरे यांनी केले.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीला कॉंग्रेस पक्षात विलीन करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे वक्तव्य बुधवारी केले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीतच पतंगराव कदम यांनी हे वक्तव्य केले होते.