शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाचा तिढा कायम असतानाच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. येत्या २९ नोव्हेंबरला मुंबईत येत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करून नव्या मंत्र्यांची नावे ठरवण्यात येणार आहेत. हा शपथविधी सोहळा येत्या १ डिसेंबरला सायंकाळी होणार असल्याचे समजते. मात्र, शिवसेनेचा सहभाग अनिश्चित असल्याने दहा-बारा मंत्रीच शपथ घेण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात योग्य सन्मान राखला न गेल्यास विरोधी पक्षात बसण्याची भूमिका शिवसेना नेत्यांनी अनेकदा जाहीर केलेली आहे. त्यामुळे तिढा सुटणे अवघड असून केवळ भाजप नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाणार आहे. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे, प्रदेशाध्यक्षपदासह पक्षकार्याची जबाबदारी कोणत्या नेत्यांवर सोपवायची, घटक पक्षांचे काय, त्यांना विधान परिषदेची जागा द्यायची की महामंडळांवर प्रतिनिधित्व द्यायचे, या बाबींवर अमित शहा यांच्याशी चर्चेनंतरच मंत्रिमंडळातील नावे ठरविली जाणार आहेत. शक्यतो १ डिसेंबरला शपथविधी होणार आहे.
गिरीश बापट, गिरीश महाजन यांच्यासारख्या काही ज्येष्ठ भाजप नेत्यांचा मंत्रिमंडळातील सहभाग निश्चित असला तरी शिवसेनेचा सहभाग होणार नसल्यास आणखी दहा-बारा मंत्र्यांचाच शपथविधी तूर्तास केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागपूर अधिवेशनानंतर पुन्हा काही काळ शिवसेनेसाठी वाट पाहिली जाईल. महामंडळांचे वाटपही तोपर्यंत थोपवून ठेवून घटक पक्षांनाही झुलवत ठेवले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.