कृषी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन अशा पर्यटन उद्योगाच्या कक्षा विस्तारत चालल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या क्षमता वाढत आहेत हे लक्षात घेऊन पर्यटन क्षेत्राचा हा महिमा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’ने पहिल्यांदाच मालिका निर्मिती केली आहे. ‘महापर्यटन – पर्यटनातून रोजगाराच्या संधी’ नावाची १३ भागांची मालिका दूरदर्शनवर प्रसारित करण्यात येणार असून, या मालिकेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधींवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
पर्यटन उद्योगाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने एमटीडीसीने वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. यात ‘महापर्यटन’अंतर्गत एमटीडीसीची निवास आणि न्याहारी योजना, ‘होम स्टे’ ही योजना, त्याचबरोबर ‘महाभ्रमण’ या संकल्पनेंतर्गत निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, आरोग्य विकास, पर्यटनातून गाव विकास अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमुळे पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत. या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना या क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी ‘महापर्यटन’ मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राची माहिती लोकांना देण्यासाठी मालिका निर्मिती करणे हा महामंडळासाठीही नावीन्यपूर्ण अनुभव आहे, मात्र यातूनच लोकांना आम्ही पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी प्रोत्साहन देऊ शकतो, असा विश्वास वाटत असल्याचे राज्य पर्यटन विभागाच्या सचिव आणि एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालिका वल्सा नायर सिंग यांनी सांगितले.
‘महापर्यटन- पर्यटनातून रोजगाराच्या संधी’ ही मालिका दूरदर्शन वाहिनीवरून शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. मालिकेच्या पहिल्याच भागात ‘कृषी पर्यटन’ क्षेत्रावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
१४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान पालिकेची स्वच्छता मोहीम
मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने मुंबईमध्ये ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान स्वच्छता मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून शाळा, उद्याने, मैदाने, बाजारपेठा, दुकाने, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा क्लिन अप मार्शल योजना सुरू करण्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले.
१४ नोव्हेंबर रोजी बाल दिन आणि १९ नोव्हेंबर रोजी जागतिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधून महापालिकेकडून या सहा दिवसांमध्ये व्यापक प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास खरगे यांनी दिली. १४ नोव्हेंबर रोजी शाळा, मैदाने, उद्यानांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहिमेचे महत्त्व पालकांना पटवून देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथही देण्यात येईल, असे ते म्हणाले.