मुंबई-गोवा महामार्गावर महाड जवळ सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना ही नैसर्गिक असून त्यात मानवनिर्मित कोणताही दोष नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाचे मे महिन्यात केलेले परिक्षणही योग्य होते, असा निर्वाळा मुंबई आयआयटीने दिला आहे.

सावित्री नदीवरील पूल २ ऑगस्टच्या मध्यरात्री कोसळला होता. त्यावेळी या मार्गावरून जाणाऱ्या दोन एसटी बसेससह काही खासगी गाडय़ाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तब्बल ४२ लोक दगावल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत २२ मृतदेह सापडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी करण्याची जबाबदारी आयआयटीकडे सोपविली होती. आयआयटी तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशीषकुमार सिंग यांना सादर केला. हवालात पुलाची दुर्घटना विक्रमी पाऊस व नदीची स्थिती यामुळे घडली असून त्यात मानवी चूक नाही, असे नमूद करण्यात आल्याचे समजते.