निवडणूक अधिकाऱ्यास धमकी प्रकरण

गडचिरोली जिल्ह्य़ातील देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याच्या आरोपांचा दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी इन्कार केला आहे. आपण अधिकाऱ्यास धमकावले असून केवळ विनंती केली, असा खुलासा जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे. मात्र त्यांच्या या खुलाशाने आयोगाचे समाधान झालेले नसून अधिक चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जानकरांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

देसाईगंज नगरपालिकेची तिसऱ्या टप्यातील निवडणूक येत्या १८ डिसेंबर रोजी होत आहे. निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करा आणि अपक्ष उमेदवारांना कपबशीचे निवडणूक चिन्ह द्या म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने जानकर यांना सोमवारी नोटीस बजाविली होती. याबाबत २४ तासात खुलासा करावा अन्यथा उपलब्ध पुराव्यांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने जानकर यांना पाठविलेल्या नोटीशीत नमूद केले होते. त्यावर जानकर यांनी आज आयोगाला आपला खुलासा पाठविला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास आपण धमकावले नसून केवळ अपक्ष उमेदवाराला कपबशी हे निवडणूक चिन्ह देण्याची विनंती केली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवास करीत होते, त्यामुळे फोनवरून बोलतांना आपण दुग्धविकासमंत्री बोलत असल्याचे सांगितले. आपल्याबाबत प्रसार माध्यमामधून दाखविण्यात आलेल्या टेपमध्ये फेरफार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी आयोगाकडे केला आहे. मात्र जानकर यांच्या या खुलाशाने आयोगाचे समाधान झालेले नाही. त्यामुळे दूरचित्रवाणी वाहिन्यांकडून जानकरांच्या धमकीबाबतची व्हीडिओ क्लीप मागविण्यात आली आहे. तसेच गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडूनही अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर  आयोग पुढील निर्णय घेईल असे सूत्रांनी सांगितले. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी संपर्क साधल्याचे जानकर यांनी मान्य केल्याने त्यांच्या अडचणीत भर पडल्याचे बोलले जात आहे.