दर वर्षांच्या आरंभाला जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात वांद्रय़ाकडे खवय्या मुंबईकरांची पावले आपसूक वळतात. कारण महाराष्ट्र शासनामार्फत गेल्या तेरा वर्षांपासून विविध उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्रीसाठी ‘महालक्ष्मी सरस’चे आयोजन करण्यात येत आहे. प्रदर्शनात मिळणाऱ्या वस्तू तुम्हाला मुंबईत इतर ठिकाणीही सहज मिळू शकतात, परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळणाऱ्या पदार्थाची अस्सल चव चाखायला येथेच मिळेल.

मुंबईतील प्रत्येक चाकरमान्याला आपल्या गावाची ओढ असतेच, पण शहराच्या धावपळीत त्याला अनेकदा वर्षांतून एकदाही गावाला जाता येत नाही. आपल्या जवळच्या माणसांसोबत तो सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला मुकत असेल तर ते म्हणजे गावच्या चवीचं जेवण. माणसांना भेटता आलं नाही तरी ‘महालक्ष्मी सरस’च्या निमित्ताने त्याची खाण्याची हौस येथे नक्कीच पूर्ण होते. लाइव्ह किचन ही या महोत्सवाची खासियत. पाच-बाय-पाचच्या स्टॉलच्या बाकडय़ांवर ठेवलेले पदार्थ पाहून केवळ तुमच्या तोंडाला पाणी सुटत नाही तर पोटातली भूकही चाळवायला लागते. एरव्ही ठरलेलेच पदार्थ खाणारी मंडळीही काही तरी नवीन दिसतंय, खमंग सुवास येतोय म्हणून ऑर्डर देताना येथे तुम्हाला दिसतील. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरपासून ते दुसऱ्या टोकाला असलेल्या नागपूर, चंद्रपूर जिल्ह्य़ातील स्टॉल्स आणि तेथील खास पदार्थ तुमच्यासाठी चालून आले आहेत.

या वर्षीच्या सरसमध्येही काही विशेष गोष्टी आहेत ज्याची चव तुम्ही तिथे जाऊन चाखायलाच हवी. विविध राज्यांमध्ये कशाला पण महाराष्ट्रांमधील जिल्ह्य़ांमध्येही मटण, चिकन, कलेजी हे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. परंतु या वर्षीच्या स्टॉलमध्ये साताऱ्याच्या एका स्टॉलवर मिळणारे मटण हे खास आहे. काळ्या रंगाचे दिसणारे हे मसालेदार सुके मटण घरगुती मसाल्यांपासून तयार केले जाते. अतिशय मऊ आणि लुसलुशीत शिजलेल्या मटणामुळे पहिल्यांदाच मटण खाणाऱ्यांनाही बाजरीच्या भाकरीसोबत त्याच्या चवीचा पुरेपूर आनंद घेता येतो. मुंबईतील अनेक हॉटेलांमध्ये थालीपीठ मिळतं, पण येथील काही स्टॉल्सवर मिळणाऱ्या हुरडय़ाच्या थालीपीठाचा आस्वादही आवर्जून घेण्यासारखा आहे. अकोला जिल्ह्य़ातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्रगती स्व. सहा. महिला बचत गटाच्या स्टॉलवर मिळणाऱ्या हुरडय़ाच्या थालीपीठाची चव विशेष आहे. थालीपीठासोबत मिळणारा मिरचीचा ठेचा, लोणचं आणि कांद्याची पात त्याची चव आणखी वाढवतो. सांगली जिल्ह्य़ातील मिरज तालुक्यातील आदर्श महिला बचत गटाच्या स्टॉलवर बिन पाण्याची कांदा भजी मिळते. गरम, कुरकुरीत भजीसुद्धा खाण्यासारखी आहे. कोल्हापूरचे मटण हे सुप्रसिद्ध आहे, पण कोल्हापूर म्हटलं की सर्वाना आठवतो तो म्हणजे तांबडा आणि पांढरा रस्सा. येथील अनेक स्टॉल्सवर तुम्हाला तो नुसताच प्यायला मिळेल. तो जरूर प्या. गेल्या काही दिवसांपासून गारेगार झालेल्या मुंबईकरांची थंडी घालवण्यासाठी येथे आणखीन एक पेय आहे. ते म्हणजे खेकडा सूप. फक्त तेच नव्हे तर त्याच्यासोबतच खेकडा करी, भाजलेला खेकडा आणि संपूर्ण खेकडा थाळी तुम्हाला येथे खायला मिळेल. त्याशिवाय मासवडी, खापरावर तयार केलेली भलीमोठी पुरणपोळी, नागपूरचे विशेष गव्हाचे मांडे आणि सावजी चिकन, मटण, अस्सल खान्देशी जळगावचे वांग्याचे भरीत आणि भाकरी, मावळचं मटक्यामध्ये तयार केलेलं चिकन आणि मटण, सोलापूरचे काळे चिकन, मिसळ, सोलकढी, कोंबडी वडे, तळलेले मासे अशी न संपणारी पदार्थाची यादी आहे. झणझणीत पदार्थाचा आस्वाद घेतल्यानंतर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील गुलमोहर महिला बचत गटाच्या स्टॉलवर मोठय़ा तांब्याच्या भांडय़ामध्ये तयार केलेली खपली गव्हाची खीर आवर्जून चाखण्यासारखी आहे. गडचिरोलीच्या मत्री बचत गटाच्या स्टॉलवर एक अत्यंत साधा आणि स्वस्त पदार्थ मिळतो तो तर जरूर खा. नारळाचा कीस आणि साखरेपासून तयार केलेला लाडू केवळ दहा रुपयांना मिळतो. गळणाऱ्या नाकाला आवर घालण्यासाठी हा जालीम उपाय आहे. मावा, बदाम, काजू आणि इलायची घातलेली भोरची सुप्रसिद्ध मिक्स कुल्फीही तुम्हाला येथे खायला मिळेल.

‘महालक्ष्मी सरस’ म्हणजेच ग्रामीण जीवनशैलीची ओळख असा नावलौकिक झालेला आहे. खाण्याच्या पदार्थासोबतच सोलापुरी शेंगांची चटणी, हातसडीचा तांदूळ, लोणची, गावरान तुरडाळ, पापड इत्यादी सहसा मुंबईत न मिळणाऱ्या वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

महालक्ष्मी सरस २०१७

  • कधी?- सोमवार, २३ जानेवारीपर्यंत.
  • कुठे?- वांद्रे रेक्लमेशन, म्हाडा मदान, लिलावती हॉस्पिटलसमोर, वांद्रे (प.), मुंबई.
  • कधी?- सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत.