ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय महानंदने घेतला असून त्यांच्याप्रमाणे अन्य सहकारी दूध संघांनाही दुधाचे दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या संघावर बरखास्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा दुग्ध विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी दूध संघाच्या बैठकीत दिला. त्याचप्रमाणे आरे दूध केंद्रावरून आरेची विक्री न करणाऱ्या केंद्रांना टाळे ठोकण्याचे आदेशही त्यांनी दिले.
दुधाच्या दराबद्दल आज झालेल्या बठकीत गायीचे दूध प्रति लिटर ३५ रुपयांप्रमाणे विकण्याचा निर्णय आरेने घेतल्याची माहिती देण्यात आली. तर महानंदनेही दोन कमी करून ३८ रुपये लिटरने दूघ विकण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे सांगितले. मात्र वारणा, गोकूळ यांसारख्या सहकारी दूध संघांनी आम्ही मुळातच शेतकऱ्यांकडून अधिक दराने दूध खरेदी करीत असून विक्रीचे दर कमी करण्यास असमर्थ असल्याची भूमिका घेतली. त्यावर आरेला जमते ते तुम्हाला का नाही असे सांगत जे दूध संघ शासनाने ठरवून दिलेल्या किमान दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करणार नाहीत, आणि कमी दराने ग्राहकांना ते विक्री करणार नाहीत, त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा खडसे यांनी दिला. राज्य शासनाचे आदेश न मानणाऱ्या दूध संघांविरुद्ध कारवाई करून संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाईदेखील करण्याचे संकेत यावेळी दिले.