कोराडी येथील सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर उभारण्यात आलेल्या ‘महानिर्मिती’च्या पहिल्या ६६० मेगावॉटच्या वीजसंचाचा बॉयलर गुरुवारी यशस्वीरित्या सुरू झाला. आता नोव्हेंबर २०१४ मध्ये या प्रकल्पातील वीज राज्याच्या ग्रिडमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण क्षमतेने ६६० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होण्याचा अंदाज आहे. राज्य सरकारने ‘महानिर्मिती’च्या माध्यमातून ६६० मेगावॉटचे तीन संच याप्रमाणे एकूण १९८० मेगावॉटच्या वीजप्रकल्पाचे काम २००९ मध्ये हाती घेतले होते. त्यातील पहिला ६६० मेगावॉटचा संच आता तयार झाला असून वीजनिर्मिती सुरू होण्यासाठीचा पहिला टप्पा असलेला बॉयलर पेटवण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला. त्याचबरोबर आणखी ६६० मेगावॉटचा दुसरा संच लवकरच सुरू होणार असून मार्च २०१५ अखेर दोन्ही वीजसंचांमधून पूर्ण क्षमतेने १३२० मेगावॉट वीज मिळण्याची अपेक्षा आहे.