राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक जागा

मेट्रो-३ प्रकल्पाकरिता मंत्रालय परिसरातील राजकीय पक्षांची कार्यालये बाधित होत असल्याने त्यांना बॅलार्ड इस्टेट परिसरात पर्यायी जागा देण्यात येणार असली तरी बहुतांशी राजकीय पक्षांनी मंत्रालय परिसरातच पर्यायी जागा मिळावी, अशी अपेक्षा सरकारकडे व्यक्त केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप, भारिप बहुजन महासंघ, समाजवादी पार्टी आदी राजकीय पक्षांची कार्यालये या परिसरात आहेत. मेट्रो स्थानकाकरिता या राजकीय पक्षांची जागा संपादित केली जाणार आहे.  राजकीय पक्षांना बॅलार्ड इस्टेट परिसरात सध्या असणाऱ्या जागेएवढीच पर्यायी जागा देण्याची तयारी शासकीय यंत्रणांनी केली आहे.

काँग्रेसने बेलार्ड इस्टेटची जागा गैरसोयीची असल्याने मंत्रालय परिसरातच जागा मिळावी, असा प्रस्ताव सादर केला आहे. नव्या जागेचे भाडे सरकारने द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे; पण भाडय़ाचा चौरस फुटाचा दर किती असावा हे नियमानुसारच निश्चित केला जाईल, अशी भूमिका मेट्रो-३च्या अधिकाऱ्यांनी घेतली. जागेचे भाडे सरकारने द्यावे, ही भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मांडली. राष्ट्रवादीनेही जागा खाली करण्याबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही.   राष्ट्रवादीला जागावाटप करताना फक्त मुख्य इमारतीचीच जागा देण्यात आली होती; पण पक्षाने पुढे कोषागार विभागाची जागा पद्धतशीरपणे ताब्यात घेतली. परिणामी कोषागार कार्यालयाला जागेची चणचण भासत आहे.

पक्षांकडे असलेली जागा

काँग्रेस (३७२० चौरस फूट), राष्ट्रवादी (८०४४ ) शिवसेना (२१६० ), भारिप बहुजन महासंघ (५७५), शेकाप (१६५० ), रिपब्लिकन कवाडे गट (२२२८ ), समाजवादी पार्टी (१३०० ).