जीएसटी मंजुरीसाठी घेण्यात आलेल्या राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात ‘बाहुबली पार्ट २’ पाहायला मिळाला. विरोधक, सत्ताधारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा?, या प्रश्नावरून जोरदार चर्चा रंगली. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ‘कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी जबरदस्त उत्तर दिले. मी ‘बाहुबली पार्ट २’ दाखवायलाही तयार आहे, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.

संघर्षयात्रेच्या वेळी विरोधी पक्षांचे नेते जळगावला गेले होते. त्यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चहापानाला बोलावलं होतं. त्यांनी स्वत: उपस्थित राहून विरोधकांचे स्वागत केलं होतं. नाथाभाऊंना विरोधी नेत्यांबद्दल प्रेम आहे. यामुळेच त्यांनी विरोधी नेत्यांचे स्वागत केलं, पण कटप्पाने बाहुबली को क्यो मारा? याचं उत्तर आम्हाला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, असा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. विरोधकांच्या या प्रश्नाला अखेर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. सभागृहात अखेरच्या दिवशी जीएसटी विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर त्यांनी सभागृहाचे सर्व सदस्य, विरोधी पक्षनेते, अध्यक्ष याचं अभिनंदन केलं. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे, असं मुख्यमंत्री बोलत असतानाच त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली. त्यात ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा? याचं उत्तर मिळालं नाही, असं विचारण्यात आलं होतं. त्यामुळं विरोधकांना चिमटा काढण्याची आयतीच संधी मुख्यमंत्र्यांना मिळाली. या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, त्यांना मी ‘बाहुबली पार्ट २’ दाखवायला तयार आहे, असा जोरदार टोला त्यांनी लगावला.