फक्त शिवतारे यांची उपस्थिती

अर्थसंकल्पीय अधिवेशनासंबंधी बोलावण्यात आलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला फक्त शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.

समितीचे सदस्य असेलल्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या उपस्थितीबाबत संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांना विचारले असता, संसदीय कार्य राज्यमंत्री शिवतारे फक्त उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली. समितीचे सदस्य असलेले अन्य मंत्री वा आमदार बैठकीला का हजर राहिले नाहीत, असे विचारले असता, सध्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका सुरु आहेत, त्यामुळे  काही सदस्य अनुपस्थिीत राहिले असावेत अशी  टिप्पणी त्यांनी केली.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा कामकाज सल्लागार समितीची व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर अध्यक्षतेखाली विधान परिषद सल्लागार समितीच्या स्वतंत्रपणे बैठका पार पडल्या.   विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य असलेले सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे बैठकीला हजर नव्हते. या संदर्भात शिंदे यांच्याशी थेट संपर्क होऊ शकला नाही, परंतु ते अन्य बैठकांमध्ये व्यस्त असल्याने सल्लागार समितीच्या बैठकीला हजर राहू शकले नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

स्मारकाचे विधेयक

या अधिवेशनात सहा अध्यादेशांचे विधेयकांत रुपांतर करुन मांडण्यात येणार आहेत. त्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापालिकेची जागा देण्यासंबंधीची तरतूद असलेल्या मुंबई महापालिका (सुधारणा) या विधेयकाचा समावेश आहे, अशी माहिती  बापट यांनी दिली.