मुंबई विभागाचा निकाल ८६.०८ टक्के, वाणिज्य प्रवेशात रस्सीखेच
बारावीच्या घसघशीत निकालाच्या गेल्या दोन वर्षांच्या प्रथेला यंदा खीळ बसली असून या वर्षी बारावीचा राज्याचा निकाल ८६.६० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल ४.६६ टक्क्यांनी घसरला आहे. मुंबई विभागाच्या निकालातही ४.०३ टक्क्य़ांची घसरण असून तो ८६.०८ टक्के इतका लागला आहे. मुंबईत वाणिज्य विभागाचीच सरशी असून तेथील प्रवेशासाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. निकालातील घसरणीमुळे महाविद्यालयांचे ‘कटऑफ’ही घसरणार आहेत.
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. गेली दोन वर्षे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण महाविद्यालयांनी खिरापतीसारखे वाटल्यामुळे निकालात चांगलीच वाढ झाली होती. निकालाच्या वाढत जाणाऱ्या या आकडेवारीला या वर्षी राज्यमंडळाने चाप लावला आहे. तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बाहेरील परीक्षकांची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले होते, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले. पर्यावरण शिक्षणासह सर्वच विषयांत महाविद्यालयांकडून वाटण्यात येणाऱ्या गुणांवर नियंत्रण आल्याचा परिणाम निकालावर झाल्याचे दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबई विभागीय मंडळातून यंदा दोन लाख ९९ हजार ५४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापकी एकूण दोन लाख ५७ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यामध्ये वाणिज्य शाखेचे एक लाख ४५ हजार १६७, विज्ञान शाखेचे ७० हजार ८२५ तर कला शाखेचे ३७ हजार ३७८ आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातून चार हजार ४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल विशेष घसरला आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष भर प्रवेश परीक्षांकडे असल्यामुळेही हा निकाल कमी झाल्याचे काही प्राध्यापकांचे मत आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आणि विद्यापीठात उपलब्ध जागांचा ताळमेळ घातला असता विज्ञान शाखेसाठी ६१ हजार २० जागा उपलब्ध आहेत. मात्र विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाला प्राधान्य देत असल्याने बीएस्सीसाठीच्या जागा पुरेशा ठरणार आहेत. मात्र यंदा ‘नीट’च्या घोळामुळे सुरुवातीला पारंपरिक पदवीला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याचे मत प्राचार्य संघटनेने व्यक्त केले आहे. कला शाखेतही उत्तीर्णापेक्षा जास्त म्हणजे ५५ हजार ८४१ जागा उपलब्ध आहेत.

प्रवेश जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात
मुंबई विद्यापीठाने यंदाही ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली आहे. मात्र संकेतस्थळ अद्ययावत होण्यासाठी काही वेळ जाणार असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेल्याचे समजते. विद्यापीठाने जाहीर केल्यानुसार जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

वाणिज्य प्रवेशासाठी कसरत..
मुंबई विभागात वाणिज्य प्रवेशासाठी चांगलीच कसरत होणार आहे. या शाखेचे एक लाख ४५ हजार १६७ विद्यार्थी उत्तीर्ण असून विद्यापीठाकडे एक लाख ३९ हजार ७३० जागाच उपलब्ध आहेत.
यामुळे या शाखेतील प्रवेशासाठी ‘अर्थकारण’ तेजीत येण्याची शक्यता असून विद्यापीठाने १५ जूनपर्यंत काही जागा वाढवून दिल्या तर विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.