दोन-चार मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरू केल्या असून दोन-चार मंत्र्यांना डच्चू देऊन किमान चार-पाच नवीन चेहरे मंत्रिमंडळात आणले जातील. त्यासाठी मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केली असून पक्षश्रेष्ठींशी विचारविनिमय केल्यावर मंत्रिमंडळात बदल होतील. काही मंत्र्यांवर पक्षाची आणि आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी सोपविली जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही त्याच वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आणखी एक-दोन मंत्र्यांवर पक्षातील कामांची जबाबदारी सोपवून मंत्रिमंडळात नवीन नेत्यांना संधी देतील, असे सूत्रांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी गणेशोत्सव काळात अडचण होईल. त्यामुळे नवरात्रीच्या मुहूर्तावर विस्तार करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत सोमवारी आयोजित केली असून त्यास फडणवीस दिल्लीस जाणार आहेत. त्या वेळी पक्षश्रेष्ठींचा वेळ मिळाल्यास विस्तारासह अन्य बाबींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. चांगली कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी स्पष्ट कल्पना दिली होती. पण तरीही फारशी सुधारणा न झाल्याने त्यांना वगळण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मंत्रिमंडळात सध्या ३८ मंत्री असून दोन जागा रिक्त ठेवल्या जातील. नवीन केवळ दोनच मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे तीन-चार मंत्र्यांना डच्चू दिला, तरच नवीन नेत्यांना संधी देता येईल. काही नेत्यांनी आपली वर्णी लावण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. विरोधकांनी मागणी केल्यावर मेहता व देसाई यांना वगळले, असे चित्र निर्माण होऊ नये, यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी त्यांच्यावर कारवाई होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.