विजयादशमी मेळाव्यात उद्धव ठाकरे भूमिका जाहीर करणार

जनतेची कामे होत नसल्याने आणि मंत्र्यांकडून कामे होत नसल्याने सत्तेतून बाहेर पडावे, अशी आक्रमक मागणी आमदारांनी केल्यानंतर आता सत्तेतून बाहेर पडायचे की भाजप किंमत देत नसताना सत्तेत चिकटून रहायचे, हा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. ते पुढील काही दिवसांत आमदार-खासदारांशी वैयक्तिक चर्चा केल्यानंतर विजयादशमीला निर्णय जाहीर करतील, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. मात्र शिवसेनेच्या पोकळ इशाऱ्यांचा भाजपवर कोणताही परिणाम झाला नसून मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार आहे.

सत्तेत चिकटून राहिल्यास शिवसेनेच्या किमान दोन-तीन मंत्र्यांना बदलले जाईल, असे संबंधितांनी स्पष्ट केले.

सत्तेत सहभागी असूनही शिवसेना गेली अडीच-तीन वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्र्यांविरोधातही कायम टीकास्त्र सोडत आहे. शेतकरी कर्जमाफीसह अनेक मुद्दय़ावर शिवसेनेने भाजपला विरोध करीत रस्त्यावरही आंदोलन केले आहे. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याचे व भाजपला धमक्या देण्याचे प्रकारही नवीन नाहीत. त्यामुळे शिवसेना आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी ठाकरे यांच्यापुढे सोमवारच्या बैठकीत केली असली तरी भाजप नेत्यांनी ते फारसे गंभीरपणे घेतलेले नाही. सरकार स्थिर असून कोणताही धोका नाही.

शिवसेनेकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. मंत्रिमंडळ विस्तार भाजपसाठी केला जाणार असून त्यासाठी शिवसेनेला कळविण्याची कोणतीही गरज नाही, असे भाजप सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस हे परदेश दौऱ्यावर जाणार असल्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे.

  • शिवसेनेला फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने ठाकरे किमान यावेळी तरी ठोस निर्णय घेतील आणि सत्तेला लाथ मारुन विरोधी पक्षात राहून भाजपला सळो की पळो करुन सोडतील, असे शिवसेना आमदारांना वाटत आहे.
  • सत्तेत राहून सरकारला विरोध करण्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनतेमध्येही चांगले मत नसल्याने आमदारांनी मागणी केल्याने आता तरी ठाकरे आक्रमक भूमिका घेतील, असे आमदारांना वाटत आहे.
  • आमदार-खासदारांशी विचारविनिमय करुन दसरा मेळाव्यातच ठाकरे भूमिका जाहीर करतील आणि सत्तेत राहिल्यास सुभाष देसाई, दिवाकर रावते यांच्यासह किमान दोन-तीन मंत्र्यांना बदलून त्यांना पक्षकार्यासाठी पाठवितील, अशी शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.